पुणे : महापालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षण मंडळाकडील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळणारा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. महापालिकेच्या वित्त आणि लेखा विभागाने कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याच्या दृष्टीने पूर्तता करण्याची सूचना खातेप्रमुखांना केली आहे. बक्षिसाच्या रकमेची घोषणा दसऱ्यापूर्वीच झाल्याने कर्मचाऱ्यांकडूनही समाधान व्यक्त होत आहे.
महापालिकेची मुख्य इमारत, क्षेत्रीय कार्यालय आणि परिमंडळ मिळून एकूण ११ हजार कर्मचारी वर्ग आहे. या कर्मचारी वर्गाला महापालिकेकडून दर वर्षी बोनस (सानुग्रह अनुदान) दिला जातो. दर वर्षी दिवाळीच्या तोंडावर ही प्रक्रिया राबविली जाते. या वेळी मात्र महिनाभर आधीच महापालिकेकडून खातेप्रमुखांना नियमांची पूर्तता करण्याची सूचना करण्यात आली आहे. वित्त आणि लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी तसे लेखी आदेश खातेप्रमुखांना दिले आहेत.
हेही वाचा – पुणे : मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत अडथळा; पीएमपीचे ‘हे’ मार्ग होणार तात्पुरते बंद
हेही वाचा – पुणे : पीएमपीच्या ताफ्यात येणार आणखी ३०० गाड्या
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सन २०२२-२३ च्या मूळ वेतनाच्या ८.३३ टक्के, तसेच उपस्थितीच्या प्रमाणात २१ हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. त्यामुळे खातेप्रमुखांनी ३० ऑक्टोबरपर्यंत तांत्रिक बाबींची पूर्तता करून त्याबाबत वित्त आणि लेखा विभागाला कळवावे, असे कळसकर यांनी या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे. बालवाडी शिक्षणसेविका, शिक्षक, शिक्षणसेवक यांनाही याचा लाभ होणार आहे.