पिंपरी : टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार हाेऊन २४ तास उलटत नाहीत, ताेपर्यंतच टाटा माेटर्सच्या सर्व कामगारांच्या बॅंक खात्यावर दिवाळी बाेनस जमा झाला आहे. टाटा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच बोनस मिळाल्यामुळे कामगार वर्ग अधिकच भावनिक झाला. दुसरीकडे कंपनीच्या इतिहासातच प्रथमच खंडेनवमी साजरी झाली नाही. कामगारांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्येष्ठ उद्याेगपती रतन टाटा यांचे बुधवारी ( ९ ऑक्टोबर) रात्री निधन झाले. गुरूवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांच्या जाण्याने टाटा समूहासह सर्व कामगार वर्ग दुःखाच्या छायेत आहे. अंत्यविधीला अद्याप २४ तासही उलटले नाहीत. मात्र, दिवाळीचा सण अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने जवळपास दहा हजार कामगारांच्या बँक खात्यात बोनस म्हणून प्रत्येकी ४९ हजार रूपये जमा केले आहेत. बोनस देत दुःखात असणाऱ्या सर्व कामगारांची दिवाळी गोड केली आहे. टाटा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच बोनस मिळाल्यामुळे कामगार वर्ग अधिकच भावनिक झाला.

हे ही वाचा…महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश

दुसरीकडे पिंपरीतील टाटा कंपनीच्या प्रकल्पात इतिहासात पहिल्यांदाच खंडेनवमीच्या पूजेत खंड पडला. प्रकल्पामध्येच सर्व कामगार एकत्र येत रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली. शहरातील टाटा माेटर्स कंपनीत दहा हजार कायमस्वरूपी तर ३० हजार कंत्राटी असे ४० हजार कामगार कार्यरत आहेत. कायमस्वरूपी कामगारांना ४९ हजार रुपये तर कंत्राटी कामगारांना ठरलेल्या करारानुसार बोनस दिला आहे.

हे ही वाचा…पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण; तपासाबाबत गृहमंत्र्यांकडून पुणे पोलिसांचे कौतुक

आमच्या दैवतावर अंत्यसंस्कार हाेऊन २४ तास हाेत नाही, ताेपर्यंत कंपनी व्यवस्थापनाने सर्व कामगारांच्या खात्यावर दिवाळी बाेनस जमा केला आहे. बाेनस मिळाल्यानंतर कामगार अधिकच भावनिक झाले आहेत, असे टाटा माेटर्स युनियनचे अध्यक्ष शिशुपाल ताेमर यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali bonuses credited to tata motors employees accounts less than 24 hours after ratan tatas death pune print news ggy 03 sud 02