दिवाळी म्हणजे खरेदी हे समीकरण बाजारपेठेच्या रेट्यात कधीच मागे पडले. आता बाराही महिने कपड्यांची दुकाने ग्राहकांनी भरभरून वाहून जाताना दिसतात. फराळाचे पदार्थ फक्त दिवाळीतच खाण्याची पद्धतही कधीच मोडून पडली. पण तरीही दिवाळी आणि वाहन खरेदी हे समीकरण मात्र अजूनही सगळ्यांच्या मनात पक्के घर करून राहिले आहे. पुण्याच्या रस्त्यांवर चालणाऱ्यांपेक्षा वाहनेच अधिक असल्याची परिस्थिती गेली काही दशके अनुभवायला येते आहे. मेट्रो आली, पीएमपीएल सुधारण्याची घोषणा झाली, रस्त्यावरील रीक्षांच्या संख्येत हजारोंनी वाढ झाली, तरी खासगी वाहन खरेदीचे पुणे आणि पिंपरी चिचवडकरांचे स्वप्न काही विरत नाही. दरवर्षी दिवाळीत या दोन्ही शहरांमधील रस्त्यांवर नव्याने उतरणाऱ्या वाहनांच्या संख्येत भरमसाठ भरच पडते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?

यंदाच्या दिवाळीत आत्तापर्यंत या दोन्ही महानगरात नव्याने सुमारे ५५ हजार वाहनांची भर पडली आहे. दिवाळी संपेपर्यंत ती संख्या आणखी वाढेल. घरातला वाढत्या वयाचा मुलगा/मुलगी १८ वर्षाचा होण्याची पालक जणू वाटच पाहात असतात. आयुष्याच्या या पहिल्या महत्त्वाच्या वळणावर पाल्याच्या हाती स्वयंचलित वाहन देण्यात पालकांना केवढी तरी इतिकर्तव्यता जाणवते. ही संस्कृती गेल्या काही दशकांत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येच पाहायला मिळते. याचे खरे कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहण्यासारखी परिस्थितीच राहिली नाही. वेळेवर पोहोचण्यासाठी स्वतःचेच वाहन हवे, ही मानसिकता इतकी खोलवर रुजली, की परवडत नसतानाही, कर्ज काढून, दर महिन्याला हप्ता भरून, पेट्रोलचा आणि दुरुस्तीचा खर्च करून वाहन घेण्याची गरज तीव्र होत गेली आणि ही वाहने दिवसाचे चोवीस तास रस्ता किंवा घर येथील जागा व्यापू लागली. पुण्यातील सगळे रस्ते वाहन चालवण्यासाठी असावेत की वाहने उभी करण्यासाठी, हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आधीच रस्ते अरूंद आणि वाहने लावण्यासाठी सार्वजनिक व्यवस्थेचा कमालीचा अभाव. अशा परिस्थितीत दरवर्षी एवढ्या मोठ्या संख्येने वाहने रस्त्यावर येऊ लागली, तर या शहराचे काय होणार?

हेही वाचा >>> बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार

प्रत्येक शहराची एक वाहन संस्कृती असते. मुंबईत स्वतःचे वाहन घेण्यापेक्षा घरापासून लोकल किंवा बेस्टच्या थांब्यापर्यंत चालत जाणे बहुतेकांना सोपे वाटते. एवढे चालणे ही तेथील नागरिकांनी दैनंदिन सवय झालेली आहे. बंगळुरू आणि पुणे या शहरांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने वाहनांची संख्या वाढतच गेली. त्याचा परिणाम सततच्या वाहतूक कोंडीत होऊन शहराचा वेगच मंदावू लागला. बंगळुरूमधील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी केवळ या मंदावलेल्या वेगाच्या कारणामुळे तेथील गाशा गुंडाळायला सुरुवात केली आणि पुण्यात प्रस्थान ठेवले. त्या कंपन्यांसाठी हा निर्णय आगीतून फुफाट्यात झाला. ज्या कारणासाठी बंगळुरूहून पुण्यात यावे, तीच डोकेदुखी येथेही असावी, हे लक्षात आल्यानंतर त्यांची हबेलहंडी न उडती तरच नवल. त्यातच पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक पट्ट्यातील गुंडगिरीला कोणीच आळा घालू शकत नसल्याचे लक्षात येऊ लागल्याने या कंपन्यांना येथूनही पळून जाण्याची तयारी करावी लागणे, हे या शहरांचे खरे दुर्दैव.

जगाच्या भविष्याचा वेध घेता येण्याची क्षमता एकोणिसाव्या शतकातच इंग्लंडसारख्या देशाला घेता आला, तसा तो आपल्याला घेता आला नाही. १८६३ मध्ये लंडन शहरात भुयारी रेल्वे सुरू करून त्या शहराने सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न हाताळण्यास सुरुवात केली आणि इकडे आपल्या या दोन शहरांत सुरू झालेली पीएमटी-पीसीएमटी ही बससेवा आपल्याच हाताने खड्ड्यात घालण्याचे पातक येथील राजकारण्यांनी केले. परिणामी रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत राक्षसी वाढ झाली. ही वाढ प्रदूषण वाढीस, वाहतूक कोंडीस, अपघातांस आणि विकासवेग मंदावण्यास कारणीभूत ठरते आहे. आपण यापासून काही बोध घेणार आहोत का?

mukundsangoram@gmail.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali pune print news zws