बाजारात झेंडूची दीड लाख किलो आवक

दिवाळीनिमित्त फुलांची मोठी आवक मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात सुरू झाली असून झेंडूला चांगली मागणी आहे. जिल्हय़ात झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे.

लक्ष्मीपूजन तसेच पाडव्यानिमित्त फुलांना मोठी मागणी असते. विशेषत: झेंडूला व्यापारी वर्गाकडून चांगली मागणी असते. त्यामुळे किरकोळ बाजारात झेंडूची चढय़ा दराने विक्री होत आहे. गेल्या दोन दिवस जिल्हय़ात अवकाळी पाऊस सुरू आहे. पावसामुळे झेंडू भिजला आहे. भिजलेल्या झेंडूला फारशी मागणी नाही. चांगल्या प्रतीच्या झेंडूना भाव मिळाला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या  फूल बाजार विभागाचे प्रमुख प्रदीप काळे यांनी दिली.

पुणे जिल्हा, उस्मानाबाद, अहमदनगर, सातारा, वाई, सोलापूर भागातून मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात झेंडूची आवक झाली.  मार्केट यार्डातून ठाणे, मुंबईसह, कोकण भागात झेंडू विक्रीसाठी पाठविला जातो. झेंडूला प्रतवारीनुसार दहा ते पन्नास रुपये असा भाव मिळाला आहे. साध्या झेंडूच्या तुलनेत कोलकाता जातीच्या झेंडूला मोठी मागणी राहिली. या जातीच्या झेंडूची पुणे जिल्हय़ात लागवड केली जाते. आकर्षक रंग आणि आकाराने मोठा असलेल्या कोलकाता झेंडूचा वापर तोरण तसेच सजावटीसाठी केला जातो. फूल विक्रेत्याकडून तसेच फुलांची सजावट करणाऱ्यांकडून झेंडूला चांगली मागणी राहिली. झेंडूसह शेवंती, गुलछडी, लीली, गुलाब गड्डीला मागणी चांगली आहे. झेंडूसह अन्य फुलांच्या खरेदीसाठी मंडई, बाबू गेनू, नेहरू चौक भागात मोठी गर्दी झाली होती.

घाऊक बाजारातील फुलांचा प्रतिकिलोचा भाव

  • झेंडू- १० ते ५० रुपये
  • शेवंती-५० ते १२० रुपये
  • गुलछडी-१०० रुपये
  • लीली- १५ ते २० रुपये
  • गुलाब गड्डी- ३० रुपये
  • कार्नेशियन-१८० ते २०० रुपये
  • बिजली-५० ते १२० रुपये

किरकोळ बाजारात झेंडू ८० ते १०० रुपये किलो

मार्केट यार्डातील फूल बाजारात अंदाजे दीड लाख किलो झेंडूची आवक झाली. काही जणांनी बाजार आवारात झेंडू विक्रीसाठी न आणता परस्पर त्याची विक्री शहराच्या वेगवेगळय़ा भागात केली. त्यामुळे बाजार आवाराच्या बाहेर झालेल्या झेंडूची नेमकी किती आवक झाली, याची नोंद नसल्याचे फू ल बाजाराचे प्रमुख प्रदीप काळे यांनी सांगितले. पावसामुळे झेंडू भिजलेला आहे. भिजलेल्या झेंडूला फारशी मागणी नाही. मंडई, बाबू गेनू चौक तसेच शनिपार भागात किरकोळ विक्रेत्यांनी झेंडू विक्रीसाठी ठेवला आहे. किरकोळ बाजारात प्रतिकिलो झेंडूला ७० ते १०० रुपये किलो असा भाव मिळाला.