पिंपरी : दिवाळीची रोषणाई खऱ्या अर्थाने जाणवते ती झगमगणाऱ्या आकाशकंदिलांमुळे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी शहरातील सर्व बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. बाजारपेठेत यंदा पर्यावरणपूरक असे खण आणि पैठणी कापडातील आकाशकंदिलांचा झगमगाट पाहायला मिळत आहे. नागरिकांना या आकाशकंदिलांची भुरळ पडत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. रस्त्यावरच्या आकाशकंदिलांच्या स्टॉलमुळे दिवाळीची चाहूल जाणवत आहे. दिवाळीची शोभा वाढवणारे वेगवेगळ्या आकारातील आणि आकर्षक रंगातील आकाश कंदील विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले आहेत. पाचशे रुपयांपासून एक रुपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत. यंदा खण आणि पैठणीच्या कापडापासून तयार केलेले पारंपरिक आकाशकंदील बाजारात आले आहेत. विविध रंगातील पैठणीच्या व खणाच्या कापडापासून बनविलेले पारंपरिक चौकोनी, षटकोनी आकाराचे आकाश कंदील हे यंदा नवीनच असल्याने ग्राहकांचा खरेदीसाठी कल दिसून येत असल्याचे विक्रेते उमेश चौधरी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>महायुतीतील नाराजांचा ‘मावळ पॅटर्न’

यंदा छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे आकाश कंदील देखील उपलब्ध आहेत. फ्लोरोसंट हंडी, मेटॉलिक हंडी हे प्रकार उपलब्ध आहे. रंगीबेरंगी कापडी व कागदी कंदील, हॅलोजन कंदील, मार्बल पेपर कंदील, वेताचा वापर केलेले कंदील, फोल्डिंगचे कंदील, मेटल स्टार, लोटस, फायरबॉल, झगमगते आकाशकंदील. विविध प्रकारच्या कलाकृतीचे, रचनात्मक आकाराचे आकाश कंदील पहायला मिळत आहेत. त्यात घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा, चांदणी, बॉल, पॅराशुट असे प्रकार आहेत. बांबूपासून तयार केलेले आकर्षक आकाश कंदील बाजारात विक्रीसाठी आले आहेत. थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळून केलेल्या पारंपरिक व पर्यावरणपूरक आकाशकंदील खरेदी करण्याकडे ग्राहक आकर्षित होत आहेत. वेगवेगळ्या रंगातील आणि विविध आकारातील आकाशकंदिलांना मागणी वाढत आहे. छोटे-छोटे आकाशकंदील डझनावर मिळत असून, दहा रुपयांपासून ते पन्नास रुपये असे दर आहेत.

मायक्रॉन आणि बांबूच्या काड्यांचे आकाशकंदील

कागद, कापडाबरोबरच मायक्रॉन आणि बांबूच्या काड्यांपासून बनविलेले आकाश कंदील हे वेगळेपणा जपत आहेत. मायक्रॉनच्या रंगबेरंगी धाग्यापासून सुरेख विणकाम केलेले आकाश कंदील लक्षवेधी ठरत आहेत. तर, बांबूच्या काड्यांपासून तयार केलेले आकाश कंदील खरेदी करण्याकडेही नागरिकांचा कल असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali festival sale of eco friendly sky lanterns in the market pune print news ggy 03 amy