दिवाळी अंकाच्या किमतीत २० टक्क्य़ांची वाढ

पुणे : झगमगत्या प्रकाशाच्या दिवाळीचा आनंद वैचारिक वाचनाद्वारे द्विगुणित करणाऱ्या ‘अक्षर फराळ’ला यंदा महागाईची झळ बसली आहे. महाराष्ट्राची वाङ्मयीन परंपरा असलेल्या दिवाळी अंकाच्या किमतीत काही मोजके अपवाद वगळता २० टक्क्य़ांनी वाढ झाली आहे. जाहिरातींचा फटका बसल्याने दिवाळी अंकांच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

महाराष्ट्राचे वैशिष्टय़ असलेल्या दिवाळी अंकांनी शंभर वर्षांहून अधिक काळापासून ही परंपरा केवळ जतन केली नाही, तर वर्धिष्णू देखील केली. वेगवेगळे विषय हाताळणारे विशेषांक आणि वेगवेगळ्या वयोगटातील वाचकांना डोळ्यासमोर ठेवून राज्यभरातून दरवर्षी किमान साडेतीनशेच्या आसपास दिवाळी अंक प्रकाशित होतात आणि चातकासारखे वाट पाहणारे वाचक या दिवाळी अंकांचे मनापासून स्वागत करतात. राज्यभरातील सर्व दिवाळी अंकांची एकूण उलाढाल ही साधारणपणे २५ कोटी रुपयांच्या घरात जाते, अशी माहिती अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी दिली.

दसऱ्यापासूनच दिवाळी अंकांचे बाजारपेठेमध्ये आगमन होते. कित्येक मराठी कुटुंबांमध्ये दिवाळीनिमित्त कपडे, दागदागिने, वाहन खरेदीबरोबरच दिवाळी अंकांच्या खरेदीसाठी काही रक्कम राखून ठेवली जाते. वसुबारस या सणापर्यंत सर्व अंक उपलब्ध होतील. जाहिरातींचा फटका बसल्यामुळे यंदा बऱ्याच दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये किमान २० टक्क्य़ांची वाढ झाली आहे. तर, वृत्तपत्रांच्या दिवाळी अंकांचे या वर्षीचे दर मागील वर्षांइतकेच कायम आहेत. दिवाळी अंकातून फार मोठय़ा प्रमाणावर अर्थप्राप्ती होत नसली, तरी वाचकांना सकस मजकूर दिल्याचे समाधान त्यांना लाभते. अक्षरधाराच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त यंदा प्रथमच ‘अक्षरधारा’ हा दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

जाहिरातींचा फटका

दोन वर्षांपूर्वी झालेली नोटबंदी, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि महारेरा कायद्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना आलेली मंदी या गोष्टींचा दिवाळी अंकांना फटका बसला असल्याचे रमेश राठिवडेकर यांनी सांगितले. मराठी भाषा आणि साहित्यासाठी आपलाही खारीचा वाटा म्हणून व्यवसायाची गणिते बाजूला ठेवून बांधकाम व्यावसायिक दिवाळी अंकांना जाहिराती देत होते, त्या यंदा फारशा मिळाल्या नाहीत. बँकांवरही जाहिराती देण्यासंदर्भात बंधने आली आहेत. राज्यातील साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती पाहता तेथूनही जाहिरात मिळण्याची शक्यता मावळली आहे. या पाश्र्वभूमीवर दिवाळी अंक प्रकाशित करण्याचे शिवधनुष्य पेलण्याची वेळ आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.