वाढती महागाई लक्षात घेता दिवाळीसाठी फराळ तयार करण्यासाठी लागणारे बजेटही वाढले आहे. अशा काळात दिवाळीमध्ये सर्वसामान्यांना रास्त दरामध्ये लाडू-चिवडा तरी उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पूना मर्चंट्स चेंबरच्या वतीने २७ वर्षांपूर्वीच सामाजिक बांधिलकीचा एक उपक्रम सुरू केला व या काळात पुणेकरांनीही त्याला भरभरून प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून रास्त दरामध्ये लाडू व चिवडा उपलब्ध करून दिला जातो. काही हजारांच्या घरात असलेला हा लाडू-चिवडा आता अडीच लाख किलोच्या घरात पोहोचला आहे. यंदाही याच प्रमाणात लाडू-चिवडा तयार करून तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू समाज कार्यालय येथे मागील आठवडय़ातच या उपक्रमाची भट्टी पेटली असून, मोठय़ा प्रमाणावर बुंदीचे लाडू व चिवडा तयार करण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी या उपक्रमाचे उद्घाटन झाले. चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती, उपाध्यक्ष प्रवीण चोरबेले, सचिव जवाहरलाल बोथरा आदी मंडळींनी या उपक्रमाविषयी माहिती दिली. २७ वर्षांपासून मोठय़ा चिकाटीने सुरू असलेल्या या उपक्रमाची नोंद गिनीज बुकातही घेण्यात आली आहे.
मागील वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वच वस्तूंच्या दरांमध्ये वाढ झाली असली, तरी यंदाच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बाजारभावापेक्षा निम्म्या दरात लाडू- चिवडा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमासाठी दिवाळीपूर्वी अनेक दिवसांपासून तयारी सुरू करण्यात येते. लाडू-चिवडय़ासाठी लागणाऱ्या वस्तू चेंबरमधील व्यापारी मंडळीच रास्त दरामध्ये उपलब्ध करून देतात. त्याचप्रमाणे घाऊक व्यापारीही कमी किमतीत माल उपलब्ध करून या उपक्रमाला हातभार लावतात. सुमारे तीनशे महिला व पुरुष लाडू-चिवडा तयार करण्यासाठी अहोरात्र काम करीत असतात. काम सुरू होण्यापूर्वी या मंडळींची आरोग्य तपासणीही करण्यात येते.
लाडू-चिवडा ८५ रुपये किलो
‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वानुसार चालविण्यात येणाऱ्या उपक्रमातील लाडू-चिवडय़ासाठी यंदा ८५ रुपये किलो दर ठेवण्यात आला आहे. मालाच्या किमती वाढत असल्या, तरी दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जात नाही. त्यामुळे पुणेकरांकडून दरवर्षी उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला जातो. यंदा दिवाळी पाडव्यापर्यंत हा उपक्रम सुरू राहील. चेंबरचे मार्केट यार्डातील व्यापार भवन, शंकरशेठ रस्त्यावरील ओसवाल बंधू समाज कार्यालय, ग्राहक पेठ (टिळक रस्ता), जयश्री ऑईल अँड शुगर डेपो (कोथरूड), जगदीश ट्रेडिंग कंपनी (हडपसर) व पुष्पम गॅस एजन्सी (बिबवेवाडी), अगरवाल प्रॉडक्ट (कर्वेनगर) या ठिकाणी उपक्रमातील लाडू-चिवडय़ाची विक्री होणार आहे.

Story img Loader