पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची मागील अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. हे काम उन्हाळ्यात सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. आता यासाठी दिवाळीचा मुहूर्त काढण्यात आला असून, हे काम १०७ दिवसांत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. दरम्यान, दिवाळीच्या काळात याचा मोठा फटका रेल्वे प्रवाशांना बसणार आहे.
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकातील यार्ड रिमॉडेलिंगचे काम उन्हाळ्यात करण्याची चर्चा सुरू होती. आता यासाठी दिवाळीचा मुहूर्त काढण्यात आला आहे. हा प्रकल्प मोठा असल्याने यासाठी सूक्ष्म पातळीपासून नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी रेल्वेच्या पुणे विभागाने रेल्वे मंडळाला पावसाळ्यानंतर काम सुरू करावे, असे कळवले आहे. ठरावीक मुदतीत हा प्रकल्प पूर्ण करावा लागणार असल्याने त्याचे खूप दिवसांपासून नियोजन सुरू आहे. दिवाळीत हे काम सुरू होईल.
हेही वाचा – झोपेच्या गोळ्यांचा नशेसाठी वापर; येरवड्यात गोळ्या विकणाऱ्या एकास पकडले
यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पामुळे पुणे रेल्वे स्थानकावरील रेल्वे सेवा विस्कळीत होणार आहे. सध्या स्थानकातून सुटणाऱ्या, येणाऱ्या आणि जाणाऱ्या अशा दैनंदिन गाड्यांची संख्या १५० आहे. यातील निम्म्या गाड्या लांब पल्ल्याच्या आहेत. या गाड्या इतर स्थानकावर वळवणे शक्य नाही. कारण नजीकच्या कोणत्याही स्थानकाची एवढी क्षमता नाही. त्यामुळे या गाड्या पुणे रेल्वे स्थानकावरूनच सुरू राहतील, असे सूत्रांनी सांगितले.
प्रवाशांची गैरसोय होणार
लोकल, इंटरसिटी आणि जवळच्या अंतरातील गाड्या हडपसर, शिवाजीनगर आणि खडकी स्थानकावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे रेल्वे रिमॉडेलिंगच्या काळात प्रवाशांना पुणे स्थानकाऐवजी हडपसर, शिवाजीनगर आणि खडकी स्थानकांवरून प्रवास करावा लागणार आहे. यामुळे पुण्याच्या जवळच्या शहरांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
हेही वाचा – ‘ई-वेस्ट’ द्या, पैसे घ्या! पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद
यार्ड रिमॉडेलिंगचे भिजत घोंगडे
पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची घोषणा २०१८ मध्ये करण्यात आली. स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी हा प्रकल्प घोषित करण्यात आला होता. लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी फलाटांची लांबी वाढवण्यात येणार आहे. याबाबत रेल्वेच्या पुणे विभागाने केंद्रीय रेल्वे मंडळाकडे प्रस्ताव पाठवला होता. नंतर करोना संकटामुळे या प्रस्तावावर निर्णय होऊ शकला नव्हता. अखेर पाच वर्षांनी या प्रकल्पासाठी मुहूर्त उजाडला आहे.