केव्हा काय खायचे याचा निर्णय व्यक्ती बहुतेक वेळा स्वत:च्या आवडीनिवडींवरून किंवा सवयीनुसार घेते. पण आपले रोजचे जेवण काय असावे हे आपल्या जनुकांच्या आराखडय़ावरून ठरवले गेले तर?..जीवनशैलीच्या आजारांचा सामना करण्याच्या प्रक्रियेतील एक भाग म्हणून व्यक्तीच्या जनुकांच्या आराखडय़ावरूनच तिचा आहार निश्चित करण्याचे तंत्रज्ञान (न्यूट्रिजीनॉमिक्स परीक्षण) देशात उपलब्ध झाले असून पुण्यातील एका प्रयोगशाळेने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शरीरातून रक्ताचा थेंबही न काढता तोंडातील लाळेच्या नमुन्यावरूनही या डीएनए चाचण्या करता येणार आहेत. त्यावरून केवळ व्यक्तीचा आहारच नव्हे तर कोणत्या प्रकारचा खेळ खेळावा किंवा कोणता व्यायाम शरीराला फायदेशीर ठरू शकेल हेही ठरवता येणार आहे. व्यक्तीच्या शरीरात कोणत्या आजारांची जनुके सुप्तावस्थेत आहेत हे ओळखून त्या आजारांचा धोका टाळण्यासाठी आधीच आहाराच्या माध्यमातून काळजी घेता येणार आहे. वाढते कोलेस्टेरॉल, काही केल्या कमी न होणारे वजन, डायबेटिसचा धोका अशा जीवनशैलीच्या आजारांसाठी या चाचण्या फायदेशीर ठरू शकतील, असे प्रयोगशाळेच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. एखाद्या व्यक्तीला ‘ग्लुटेन’युक्त किंवा दुग्धजन्य पदार्थाची अॅलर्जी आहे का, अशी माहितीही या चाचण्यांमधून मिळणार आहे.   
मात्र सध्या तरी या चाचण्या देशात खर्चिक आहेत. या चाचणीला १७,५०० ते २६,००० रुपये खर्च येणार असून डीएनएची हवी ती चाचणी करण्यापूर्वीचे समुपदेशन, प्रत्यक्ष चाचणी आणि त्यानंतरचे तज्ज्ञांचे मार्गदर्शन यांचा या खर्चात समावेश असणार आहे.
‘जीनऑम्बिओ टेक्नोलॉजीज’ आणि ‘रेसिलियंट कॉस्मेक्युटिकल्स’ या कंपन्यांतर्फे ‘जीनसपोर्ट’ ही न्यूट्रिजीनॉमिक्स परीक्षण करणारी प्रयोगशाळा बाणेरमध्ये सुरू करण्यात आली असून दक्षिण आफ्रिकेतील ‘डीएनएलायसिस बायोटेक्नोलॉजी’ आणि डेन्मार्कमधील ‘नॉर्डिक लॅब्ज’ या कंपन्यांनी स्थापन केलेल्या ‘डीएनए लाइफ’ या कंपनीचे साहाय्य या प्रकल्पाला मिळणार आहे.
‘आमच्या मुलाला कोणत्या खेळात घालू?..’
आपल्या मुलाला किंवा मुलीला कोणता खेळ खेळायला पाठवावे, असा प्रश्न घेऊन डीएनए चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये जाणाऱ्या पालकांची संख्या लक्षणीय असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या पालकांना त्यांच्या मुलांनी खेळाव्या अशा खेळाचे नेमके नाव सांगणे शक्य नसले, तरी कोणत्या प्रकारच्या खेळासाठी त्याचे शरीर बनले आहे याचे उत्तर मात्र त्यांना जनुकीय चाचणीवरून सहज मिळणार आहे.

Story img Loader