पुणे : स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. गाडे याची डीएनए चाचणी करण्यात आली असून, चाचणीचा अहवाल पोलिसांना अद्याप उपलब्ध झाला नाही. स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात २५ फेब्रुवारी रोजी आरोपी गाडेने प्रवासी तरुणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर गाडे पसार झाला.
गाडे मूळचा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा आहे. पसार झाल्यानंतर गाडे गुनाट गावातील ऊसाच्या फडात लपून बसला होता. तीन दिवसांनी गाडेला तेथून अटक करण्यात आली. बलात्काराच्या घटनेला मंगळवारी (२५ मार्च) एक महिना पूर्ण होत आहे. गाडेविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. ‘गाडे याची डीएनए चाचणी करण्यात आली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप डीएनए चाचणीचा अहवाला मिळालेला नाही,’ अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
डीएनए चाचणीचा अहवाल मिळाल्यानंतर गाडेविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. गाडे याचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. गाडेविरुद्ध तांत्रिक, तसेच न्यायवैद्यकीय पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या प्रकरणात पीडित तरुणीचा जबाब (कलम १६४ अन्वये) न्यायाधीशांसमोर नोंदवून घेण्यात आला आहे. तसेच, ज्या बसमध्ये गाडेने तरुणीवर बलात्कार केला होता. त्या बसचा चालक आणि वाहक यांचेही जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.
गाडेचा मोबाइल संच मिळाला नाही
तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेल्या गाडेने त्याचा मोबाइल संच फेकून दिला होता. त्याचा मोबाइल संच जप्त करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, त्याचा मोबाइल संच सापडला नाही. स्वारगेट बलात्कार प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची विनंती पुणे पोलिसांनी गृह विभागाकडे केली आहे. गाडेविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे आणि पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.