पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी दिले. अटकेत असलेल्या आरोपीची वैद्यकीय तपासणी तसेच डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

बोपदेव घाटात ३ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयीन तरुणी आणि मित्राला कोयत्याचा धाक दाखविण्यात आला. आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणात पसार असलेल्या आरोपीला कोंढव्यातील येरवडा परिसरातून पोलिसांनी अटक केली. अटकेत असलेल्या २५ वर्षीय आराेपीला शनिवारी पोलिसांनी न्यायलायात हजर केले.

हेही वाचा >>>पुणे : नवीन सात पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती

आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे.अटक आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे, तसेच डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. आरोपींनी गुन्हयात वापरलेला कोयता आणि वाहन जप्त करायचे आहे. आरोपींनी पीडित तरुणीला धमकावून तिच्याकडील सोनसाखळी चोरली असून, ती जप्त करायची आहे, असे सहायक सरकारी वकील ॲड. विजयसिंह जाधव यांनी युक्तिवादात न्यायालयात सांगितले.

हेही वाचा >>>पुणे : श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान

बलात्कार प्रकरणातील आरोपी सराइत आहेत. अटकेत असलेल्या आरोपीचे साथीदार पसार झाले आहे. त्यांचा शोध घ्यायचा आहे. पसार झालेल्या आरोपींची माहिती घ्यायची आहे. तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती ॲड. जाधव यांनी युक्तिवादात केली. न्यायलायाने आरोपीला १५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

याप्रकरणातील तीन आरोपी मूळचे मध्य प्रदेशातील आहेत. किरकोळ कामे करुन ते उदरनिर्वाह करायचे. लूटमारीचे गुन्हे करण्यासाठी ते मध्य प्रदेशातून पुण्यात आले होते. बोपदेव घाटात गुन्हा करण्यापूर्वी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी त्यांचे मोबाइल संच बंद केले. घाटात एके ठिकाणी त्यांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर ते लूटमार करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी त्यांनी एकातांत बसलेल्या तरुण-तरुणीला पाहिले. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्यांनी दोघांना मारहाण केली. कोयत्याच्या धाकाने तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता.