लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी शोएब अख्तर उर्फ शोएब बाबू शेख याची डीएनए चाचणी केली जाणार आहे. याप्रकरणातील आरोपी घटनास्थळी थुंकले होते. आरोपी शेख यांचे रक्त, नखे, तसेच थुंकीचे नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्यााचे पोलिसांनी बुधवारी न्यायालयात सांगितले. शेख याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरायला आलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी घडली होती. याप्रकरणी पसार झालेल्या शेखला गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशातील प्रयागराज परिसरातून ताब्यात घेतले. त्याचा साथीदार चंद्रकुमार रवीप्रसाद कनोजिया (वय २०, रा. उंड्री, कोंढवा) याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून त्याची रवानगी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी शेख असून, त्याच्याविरुद्ध बलात्कारसह लुटमारीचा गुन्हा भिगवण पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.

आणखी वाचा-पोलीस कारवाईची भीती दाखवून तरुणाची २३ लाखांची फसवणूक

शेख, कनोजिया आणि साथीदारांनी केलेले कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे आहे. तरुणीला धमकाविण्यासाठी त्यांनी कोयत्याचा वापर केला. तिच्याकडील सोनसाखळी, सोन्याचे पेंडट, चांदीची अंगठी त्यांनी चोरली. आरोपींकडून कोयता, तसेच ऐवज जप्त करायचा आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. दुचाकी जप्त करायची आहे. शेख गु्न्हा केल्यानंतर पसार झाला होता. या काळात त्याला कोणी आश्रय दिला, यादृष्टीने तपास करायचा आहे. आरोपींच्या लैंगिक सक्षमतेची चाचणी (पोटेन्सी टेस्ट) करायची असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे यांनी युक्तिवादात केली. न्यायालायने युक्तिवाद ग्राह्य धरून शेखला २२ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

आणखी वाचा-शालेय पोषण आहार योजनेत महत्त्वाचा बदल… आता काय होणार? 

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक युवराज हांडे तपास करत आहेत.