पिंपरी : महापालिकेच्या नवीन थेरगाव, भोसरी रुग्णालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. ‘एमबीबीएस’नंतरच्या पदव्युत्तर पदविका (डीएनबी) अभ्यासक्रमाच्या चार विषयांसाठी राष्ट्रीय परीक्षा बोर्डाची मान्यता मिळाली आहे. राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेतून पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थी उपलब्ध होताच हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने नवीन थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालयात पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. याबाबत महापालिकेने दिल्लीतील राष्ट्रीय परीक्षा बोर्डाला प्रस्ताव पाठविला होता. त्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयातील पायाभूत सुविधा, वसतिगृहाची पाहणी केली. त्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास ६ ऑक्टोबर रोजी मान्यता दिली. १४ डॉक्टरांच्या जागांना मंजुरी मिळाली आहे. थेरगाव रुग्णालयासाठी १२, तर भोसरी रुग्णालयासाठी दोन जागा असणार आहेत. त्यामध्ये स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, बालरोग, भूलतज्ज्ञ विषयांचा समावेश आहे.
हेही वाचा – पुणे : ‘लेझर बीम’च्या विरोधात आता सर्वपक्षीय लढा, जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय
‘एमबीबीएस’नंतरचे १४ विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी रुग्णालयात येणार आहेत. या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नव्याने प्राध्यापकांची भरती केली जाणार नाही. महापालिका रुग्णालयातील उपलब्ध डॉक्टरच विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत. एमबीबीएस झालेले हे विद्यार्थी निवासी असतील. त्यासाठी थेरगाव रुग्णालयात वसतिगृह उभारण्यात आले आहे. हे विद्यार्थी चोवीस तास उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे महापालिकेचे वैद्यकीय मनुष्यबळ वाढणार असून, सेवा पुरविण्यासाठी फायदा होणार आहे. वैद्यकीय शिक्षण सुरू राहण्याबरोबरच सेवेचा दर्जा सुधारणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असणार आहेत.
हेही वाचा – पुणे : कोथरूड भागात रिक्षावर झाड कोसळून चौघे जखमी
‘डीएनबी’ अभ्यासक्रम सुरू झाल्याने एमबीबीएस झालेले डॉक्टर मिळतील. त्यांना शिकविण्यासाठी नवीन प्राध्यापक भरण्याची आवश्यकता नाही. सद्य:स्थितीतील डॉक्टरांच्या अधिपत्याखालीच शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे प्राध्यापकांचा कोणताही खर्च न वाढता हे अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. भविष्यात इतर विषयांसाठीसुद्धा अर्ज करणार आहोत. त्याचबरोबर नवीन आकुर्डी, जिजामाता रुग्णालयातही ‘डीएनबी’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका