ज्ञान प्रबोधिनी शाळेमधील विद्यार्थ्यांना न्यायालयाने दिलासा दिला असून शाळेची पाचवीची प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली.
शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळेतील प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया घेता येत नाहीत. मात्र, ज्ञान प्रबोधिनी शाळेने प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून पाचवीच्या वर्गाचे प्रवेश केले. याबाबत विविध संघटनांनी शालेय शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. ज्ञान प्रबोधिनी शाळेने प्रवेश परीक्षा घेऊन शिक्षण हक्क कायद्याचा भंग केल्यामुळे या वर्षीचे पाचवीचे प्रवेश रद्द ठरवण्याचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते. शिक्षण विभागच्या निर्णयाविरुद्ध शाळेने उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली होती.
उच्च न्यायालयाने शाळेची प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याच्या निर्णयावर एक वर्षांसाठी स्थगिती दिली आहे. त्यामुळे ज्ञान प्रबोधिनी शाळेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मंगळवारपासून शाळेचे पाचवीचे वर्ग सुरू होणार असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद नाईक यांनी दिली.
शालेय शिक्षण विभागाकडून प्रभावीपणे बाजू मांडण्यात आली नसल्याचा आरोप शाळेविरुद्ध तक्रार करणाऱ्या सिस्कॉम या संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र धारणकर यांनी केला आहे. धारणकर यांनी सांगितले, ‘‘शाळा दिशाभूल करत आहे. शाळेची प्रवेश प्रक्रिया राबवली जात असताना शाळेला नोटीस देण्यात आली होती, तरीही शाळेने प्रवेश प्रक्रिया राबवली आहे. त्याचबरोबर या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्वीच्या शाळेमध्ये प्रवेश देण्यात येईल, अशी ग्वाही शिक्षण विभागाने दिली असल्याची बाबही न्यायालयापासून लपवून ठेवण्यात आली आहे.’’ न्यायालयाचे आदेश लेखी स्वरूपात मिळाल्याशिवाय त्याबाबत प्रतिक्रिया देणे शक्य नसल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी सांगितले.