प्रकाश खाडे, जेजुरी –

सार्‍या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत आज ( १६ जून ) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे भंडारा उधळून स्वागत करण्यात आले. सासवडहून सकाळी पंढरपुरकडे निघालेला वैष्णवांचा मेळा जेजुरीजवळ आला. यावेळी लांबूनच खंडोबाचा गड दिसू लागताच वारकर्‍यांच्या आनंदाला उधाण आले. दिंड्यांमधील वारकर्‍यांच्या टाळ-मृदुंगाचा आवाज वाढला. विठूनामाच्या गजराबरोबरच ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जयघोष सुरु झाला. दिंड्यातील वारकरी नाचू लागले. विविध भारुडे, पदे, अभंग दिंड्यातून ऐकायला येऊ लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“‘अहं वाघ्या, सोहम वाघ्या प्रेमनगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी’, असे अभंग म्हणत वारकर्‍यांनी देवाच्या दारात मल्हारी वारी मागितली. अठरापगड जातींचं श्रद्धास्थान असलेला खंडोबा व पंढरीचा विठोबा या दैवतांच्या भक्तिरसात सारे जण न्हाऊन निघाले.

ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू सोपानकाकांच्या सासवड नगरीतून रविवारी सकाळी पालखीने जेजुरीकडे येण्यासाठी प्रस्थान ठेवले. वाटेत बोरावके मळ्यात सकाळची न्याहारी व यमाई शिवरीत भोजन उरकून पालखीने सासवड ते जेजुरी हा १७ कि.मी चा टप्पा पार केला. सोहळ्याने सायंकाळी पाच वाजता जेजुरी नगरीत प्रवेश केला.

यावेळी पालखीवर पिवळ्याधमक भंडार्‍याची मुक्त उधळण करण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता पालखी सोहळा ऐतिहासिक होळकर तलावाच्या काठी असलेल्या पालखी तळावर पोहचला. तेथे समाज आरती करण्यात आली. दररोज खंडोबाला येणार्‍या भाविकांमध्ये गुंतलेली सारी जेजुरी नगरी आज मात्र वारकरी बांधवांचे आदरातीथ्य व सेवा करण्यात व्यस्त होती. गावामध्ये विविध संस्था, मंडळांच्या वतीने वारकरी बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. गावामध्ये चिंचेची बाग, छत्री मंदिर, लवथळेश्वर, औद्योगिक वसाहत, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी तंबू उभारून वारकरी दिंडय़ा उतरल्या होत्या.

वारकरी बांधवांची खंडोबा गडावर प्रचंड गर्दी

जेजुरीत माउलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी खंडोबा गडाला आकर्षक विद्युत रोषणाई व मुख्य मंदिरात गुलाबाच्या फुलांची आकर्षक आरास केली होती. आज हजारो वारकरी बांधवांनी खंडोबा गडावर जावून देवदर्शन घेतले. पहाटेपासून खंडोबाच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. दुपारीच सारा गड वारकऱ्यांच्या आगमनाने फुलून गेला. वारीमध्ये चालून पाय दुखत असले तरी त्याची पर्वा न करता चारशे पायऱ्यांचा गड चढून आलेल्या वारकरी बांधवांमध्ये मोठा उत्साह जाणवत होता.

“‘पंढरीत आहे रखुमाबाई, येथे म्हाळसा बाणाई, तिथे विटेवरी उभा, येथे घोड्यावरी शोभा, तेथे बुक्क्याचे लेणे येथे भंडार भुषणे’, अशा भोळ्या भावाने भक्तीगीते गात महिला फेर धरीत फुगड्या खेळीत होत्या. पंढरीला जाता-जाता खंडोबाचे दर्शन झाल्याचा आनंद त्यांचा चेहर्‍यावर जाणवत होता.

वारकर्‍यांची हक्काची सावली हरवली

आळंदी-पंढरपूर पालखीमार्ग हा केंद्र शासनाने राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित केला असून रस्ता रुंदीकरण काम वेगात सुरु आहे. या रुंदीकरणासाठी दिवे घाट ते निरा या मार्गातील वड,पिंपळ.लिंब यासारखे मोठ-मोठे वृक्ष काढण्यात आले. यामुळे रस्ता उजाड झाला आहे.वारकर्‍यांना रस्ताने चालणे सोपे झाले. पण, उन्हात चालून दमल्यावर आवश्यक असणारी रस्त्याकडेच्या झाडांची हक्काची सावली हरवली, अशी खंत अनेक वारकर्‍यांनी व्यक्त केली. शासनाने वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

होळकर व पेशवे तलावात वारकर्‍यांचे स्नान

मागील वर्षी जेजुरी परिसरात पुरेसा पाऊस झाल्याने ऐतिहासिक होळकर व पेशवे तलावात पाणी भरपुर आले होते. यंदा कडक उन्हाळा असूनही या दोन्ही तलावात अजुनही पुरेसा पाणीसाठा असल्याने याठिकाणी हजारो वारकरी बांधवांनी आपले स्नान उरकले, कपडे धुतले. प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी जागोजागी टॅकर उभे केल्याने पाणीटंचाई जाणवली नाही.