पंढरीकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याला मंगळवारी झालेल्या नीरा स्नानानंतर पुणे जिल्ह्यातून मोठय़ा उत्साहात निरोप देण्यात आला.

पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला विशेष महत्त्व आहे. टाळ मृदंगाच्या तालावर माउलींच्या पादुकांना दुपारी अडीच वाजता नीरा नदीत विधियुक्त स्नान घालण्यात आले. त्यानंतर पालखी सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. वाल्हे येथे सकाळी साडेदहा वाजता महापूजा झाल्यावर सोहळा लोणंदकडे मार्गस्थ झाला. पिंपरे खुर्द येथे न्याहारी झाल्यावर सकाळी अकरा वाजता पालखी सोहळा नीरा येथे आला. यावेळी सरपंच दिव्या पवार, उपसरपंच दीपक काकडे, पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य विराज काकडे, माजी सभापती दत्ताजीराव चव्हाण, पंचायत समिती सदस्या सुजाता दगडे यांनी सोहळ्याचे स्वागत केले. पालखी तळावर हजारो भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. दुपारचे भोजन व विसावा उरकल्यावर माउलींची पालखी नीरा स्नानासाठी निघाली.

जिल्हाधिकारी सौरभ राव, पुरंदर-दौंडचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार संजय पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी भारावलेल्या वातावरणात माउलींना निरोप दिला. सातारा जिल्ह्यात माउलींच्या पालखी सोहळ्याने दुपारी तीन वाजता प्रवेश केला. साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, आमदार मकरंद पाटील, आनंदराव पाटील, वाईचे प्रांताधिकारी अस्मिता मोरे,

सातारा जिल्हा परिषदेचे प्रभारी

अध्यक्ष रवी साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख यांनी पालखीचे स्वागत केले. रिमझिम पावसात सायंकाळी पालखी सोहळा लोणंद येथे विसावला.

Story img Loader