साऱ्या महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने रविवारी पाच वाजता प्रवेश केला. त्या वेळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थ व भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केल्याने सारा परिसर सोन्यासारखा पिवळाधमक झाला अन् माउलींची पालखी भंडाऱ्यात न्हाली. टाळ-मृदंगाच्या तालावर वारकरी करीत असलेला विठूनामाचा गजर व खंडोबाभक्तांचा ‘येळकोट येळकोट जयमल्हार’ या जयघोषाने सारे वातावरण भक्तिमय झाले.
बोरावके मळ्यात सकाळची न्याहारी व यमाई शिवरीत भोजन उरकून पालखीने सायंकाळी जेजुरी नगरीत प्रवेश केला. खंडोबाचा ऐतिहासिक गड लांबूनच दिसू लागल्यावर वारकरी बांधवांच्या खंडोबा भक्तीप्रेमाला उधाण आले. मल्हारी वारी व खंडोबाची पारंपरिक गीते म्हणताना वारकरी नाचत होते . पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जेजुरीच्या नगराध्यक्षा सुरेखा सोनवणे, उपनगराध्यक्ष संपत जगताप, प्रांत समीर शिंगटे , तहसीलदार संजय पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक भरते, मुख्याधिकारी समीर भुमकर, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त अॅड. दशरथ घोरपडे, विश्वस्त डॉ.प्रसाद खंडागळे, संदीप घोणे, सुधीर गोडसे, अॅड. वसंत नाझीरकर, अॅड.किशोर म्हस्के आदी उपस्थित होते. सायंकाळी सहा वाजता पालखी तळावर पोहोचली.
पंढरीत आहे रखुमाबाई , येथे म्हाळसा-बाणाई,
तिथे विटेवरी उभा , येथे घोड्यावरी शोभा,
तिथे बुक्याचे रे लेणे , येथे भंडार भुषणे
अशी गाणी म्हणत महिला भक्तांनी एकमेकींना भंडार व बुक्का लावीत फुगड्या खेळल्या. ज्या भाविकांना गड चढणे शक्य नाही त्यांच्यासाठी देवस्थानतर्फे पालखीमार्गावर भव्य स्क्रीन लावून दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. सासवड-जेजुरी रस्ता रुंदीकरणामुळे मोठा झाल्याने वारकऱ्यांना चालणे सोपे झाले. सोमवारी (४ जून) जेजुरीत येथे सोमवती यात्रा आहे. या यात्रेनिमित्ताने खंडोबा देवाची पालखी गडावरुन कऱ्हा स्नानासाठी सकाळी अकरा वाजता निघणार आहे .गावामध्ये विविध संस्था, मंडळांच्या वतीने वारकरी बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. शासनाच्या निर्मलवारी अभियानांतर्गत पाचशे शौचालये उभारल्याने वारकऱ्यांची चांगली सोय झाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा