किसनमहाराज साखरे यांनी अनुवादाचे शिवधनुष्य पेलले
‘ॐ नमोजी आद्या’ या ओवीपासून झालेला प्रारंभ आणि ‘आता विश्वात्मके देवे येगे वाग्यज्ञे तोषावे’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना असलेले पसायदान, रणांगणावर गर्भगळीत झालेल्या अर्जुनाला उपदेश करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेचे हे तत्त्वज्ञान सुलभ मराठीत आणणारा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा १८ अध्यायातील ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ आता देशभरातील अभ्यासकांसाठी उपलब्ध होत आहे. ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसनमहाराज साखरे यांनी हिंदूी अनुवादाचे शिवधनुष्य पेलले असून तीन खंडांमध्ये असलेले ज्ञानेश्वरीचे तत्त्वज्ञान अमराठी भाषकांसाठी खुले झाले आहे.
ज्ञानेश्वरी अभ्यासाची गुरू-शिष्य परंपरा असलेल्या साखरेमहाराज घराण्यातील किसनमहाराज साखरे यांनी अमृतमहोत्सवी सांगता वर्षांत ज्ञानेश्वरीच्या हिंदूी अनुवादाचा संकल्प सोडला होता. त्यानंतर गेली चार वर्षे दररोज दहा तास काम करून त्यांनी हिंदूी अनुवादाचे कार्य नुकतेच पूर्ण केले आहे. वयाच्या ८० व्या वर्षी साखरे यांचे ज्ञानेश्वरी प्रसार आणि ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे शुक्रवारपासून (१३ एप्रिल) तीन दिवसांचे पसायदान विचार संमेलन होत असताना ज्ञानेश्वरीचा हिंदूी अनुवाद आता प्रकाशनाच्या वाटेवर असल्याची माहिती किसनमहाराज साखरे यांचे पुत्र आणि शिष्य यशोधन साखरे यांनी दिली.
आद्य साखरेमहाराज यांच्यापासून घराण्यामध्ये ज्ञानेश्वरी अभ्यासाची परंपरा सुरू झाली. त्यांचे पुत्र नानामहाराज साखरे यांनी ज्ञानेश्वरी प्रवचनाची प्रथा सुरू केली. दादामहाराज साखरे आणि तात्यामहाराज साखरे यांच्यानंतर ही धुरा किसनमहाराज साखरे यांच्याकडे आली. किसनमहाराज साखरे यांनी ज्ञानेश्वरी विषयावर आतापर्यंत ८० ग्रंथांचे लेखन केले आहे. ‘मावळवित विश्वाभासू’ या ज्ञानेश्वरीच्या १६ व्या अध्यायातील पहिल्या ओवीवर एक हजार पृष्ठांचा ग्रंथ लिहिला आहे. ‘नवरसी भरवी सागरू’ या ग्रंथातून ज्ञानेश्वरीतील रसविचार आणि ‘उचित रत्नांची अलंकारू’ या ग्रंथातून ज्ञानेश्वरीतील अलंकार विचारावर रसाळ शैलीत भाष्य केले आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी सप्तशताब्दी वर्षांचे औचित्य साधून किसनमहाराज साखरे यांनी ‘सी-डॅक’चे तत्कालीन संचालक आणि ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वरी दृक-श्राव्य माध्यमात इंटरनेटवर ठेवली आहे. उत्तर प्रदेशातील साधू निश्चलदास यांच्या ‘विचारसागर’ आणि ‘वृत्ती प्रभाकर’ या मूळ ग्रंथांचा अनुवाद केलेला असल्यामुळे किसन महाराज साखरे यांचे मराठी आणि संस्कृतप्रमाणेच हिंदूी भाषेवरही प्रभुत्व आहे. ज्ञानेश्वरीचा अनुवाद करताना त्यांनी अनेक संस्कृतोद्भव शब्दांची निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे हिंदूीमध्ये अनेक नवे शब्द तयार केले आहेत. यापूर्वी त्यांनी ‘अमृतानुभव’चा हिंदूी अनुवाद केला असून ‘भाव पराग’ या छोटेखानी हिंदूी पुस्तकाद्वारे ज्ञानेश्वरी साररूपाने सांगितली आहे. आता संपूर्ण ज्ञानेश्वरीचा हिंदूी अनुवादाचा संकल्प सिद्धीस गेला असल्याने हे कार्य पूर्ण झाल्याची कृतार्थतेची भावना त्यांच्या मनात आहे, असे यशोधन साखरे यांनी सांगितले.
प्रस्थानत्रयींचे एकमेव अभ्यासक
संस्कृत भाषेतील ‘भगवद्गीता’, ‘ब्रह्मसूत्र’ आणि ‘उपनिषद’ हे तीन ग्रंथ तर, प्राकृत भाषेतील ‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि ‘तुकाराम गाथा’ हे तीन ग्रंथ म्हणजे प्रस्थानत्रयी मानले जातात. संस्कृत प्रस्थानत्रयीच्या अभ्यासकांना संतसाहित्याची जाण नसते. तर, प्राकृत प्रस्थानत्रयीच्या अभ्यासकांनी संस्कृत भाषा आत्मसात केलेली नसते. मात्र, किसनमहाराज साखरे हे दोन्ही प्रस्थानत्रयीचे एकमेव अभ्यासक आहेत, याकडे यशोधन साखरे यांनी लक्ष वेधले.