पिंपरी: यंदा इंद्रायणी नदीत पुरेसा पाणीसाठा आहे. मात्र, त्यात गावातील सांडपाणी मिसळत आहे. देहू नगरपंचायत प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून गावातील सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडू नका, अशी मागणी संस्थानने केली आहे. वैकुंठस्थान स्थानाजवळ दररोज सांडपाणी नदीत सोडले जात आहे. या ठिकाणी भाविक आंघोळ करून तीर्थ म्हणून तेच पाणी पितात. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज बीज सोहळा गुरुवारी (दि. ९) होत असून लाखो भाविक देहूत दाखल होत आहेत. भाविकांसाठी आरोग्य, निवारा आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय संस्थानने केली आहे. संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला ३७५ वर्ष होत आहे. राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या भाविकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. याबाबतची माहिती संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली.

आणखी वाचा- पुणे: राज्याच्या काही भागांत गेल्या २४ तासात पावसाची हजेरी; मध्य महाराष्ट्रात गारा, आजही हलक्या सरींची शक्यता

भाविकांच्या सुरक्षेसाठी देऊळवाड्यात एकूण ३२ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वैकुंठगमन सोहळ्याचा ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे. दिंडी प्रमुख, शासकीय सर्व खात्यातील अधिकारी यांना संस्थानने पत्रव्यवहार केला आहे. दोन दिवसांत दिंड्या देहूत दाखल होतील. दर्शनबारीची नव्याने दुरुस्ती करण्यात आली असून, पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे.

आणखी वाचा- पुणे: घरकाम जमत नसल्याने सासूकडून सुनेचा खून, लोहगाव भागातील घटना

शुद्ध पाण्यासाठी फिल्टर बसविण्यात आले असून स्वच्छतेसाठी सोळा कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देऊळवाड्यात औषधोपचाराची सुविधा उपलब्ध असून स्वच्छता आणि साफसफाईसाठी प्रबोधन करण्यात येणार आहे. इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करण्यात येत असून नव्याने बांधण्यात आलेल्या भक्त निवासात वारकर्‍यांची सोय करण्यात आलेली आहे. पित्ती धर्मशाळेतही भाविकांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संस्थानच्या वतीने यात्रा काळात महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांना गाथा उपलब्ध व्हावी, यासाठी संस्थानने नवीन छपाई केलेली आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not leave flow of drainage water in indrayani river pune print news ggy 03 mrj
Show comments