कोणत्याही परिस्थितीत गुन्हेगारीचे उदात्तीकरण होता कामा नये, असे सांगत गुन्हेगाराला कायद्याची भीती ही वाटलीच पाहिजे, असे मत विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. स्पर्धा परीक्षेत मराठी तरूण मागे आहे, ही शोकांतिका आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पिंपळे सौदागर येथील महात्मा फुले एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार अॅड. निकमांच्या हस्ते करण्यात आला, तेव्हा ते बोलत होते. माजी न्यायमूर्ती सुधाकर गुंडेवार, लेखक संभाजी भगत, शिक्षण संचालक महावीर माने, अपर पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, ‘यशदा’चे बबन जोगदंड, संस्थेचे अध्यक्ष अरूण चाबुकस्वार उपस्थित होते.
अॅड. निकम म्हणाले, प्रसारमाध्यमांवर मोठी नैतिक जबाबदारी आहे, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूबला फाशी देण्याची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तसे माध्यमांमधून अनेक प्रवाद केले गेले. सर्वात कडी म्हणजे छोटा शकीलची मुलाखत काही वाहिन्यांनी प्रसारीत केली. आपण काय करतो, याचे भान असले पाहिजे. गुन्हेगारीचे उदात्तीकरण होऊ नये, तसे होत असल्यास गुन्हेगारांना ते हवेच असते. प्रत्येकाने आपली लक्ष्मण रेषा ठरवून घेतली पाहिजे. तरूणांनी सुशिक्षित तसेच सुसंस्कृत व्हायला हवे, त्यासाठी चांगले वाचन व चांगले आदर्श हवेत. द्विधा मनःस्थिती निर्माण होईल, असे अनेक प्रसंग येतात. मात्र आत्मविश्वासाने सामोरे जावे. आयुष्य म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत झुंज देण्यासाठीचे रणांगण आहे. जिद्द नसते म्हणूनच मराठी माणूस कमी पडतो. नशीबाला दोष देत बसण्यापेक्षा चिकाटीने प्रयत्न केल्यास निश्चित यश मिळते. विद्यार्थ्यांनी मोठे उद्दिष्ट ठेवावे, त्याला प्रामाणिक प्रयत्नांची जोड असावी. सध्याच्या टीव्ही मालिका पाहता त्यातून काय आदर्श घ्यायचा आणि आपण कुठे जाणार आहोत, ते कळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा