पुणे : ‘मी देव झालो, असे स्वत: म्हणू नये. तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या,’ अशा शब्दांत येथे आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी उपस्थितांचे ‘बौद्धिक’ घेतले. ‘क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखे कधी होऊ नये. चमकणे डोक्यात जाते. त्यामुळे वीज होऊन चमकण्यापेक्षा पणती होऊन तेवत, जळत राहावे,’ असा ‘सल्ला’ही त्यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पूर्व सीमा प्रतिष्ठानच्या वतीने संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक कै. शंकर दिनकर तथा भय्याजी काणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात डाॅ. भागवत बोलत होते. प्रतिष्ठानचे सचिव जयवंत कोंडविलकर, रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव यांच्यासह बांधकाम विकासक नितीन न्याती या वेळी उपस्थित होते. संघाच्या विविध स्वयंसेवक आणि प्रचारकांनी केलेल्या देदीप्यमान कार्याचा गौरव करताना डाॅ. भागवत यांनी हा सल्ला दिला.

हेही वाचा – कांद्याचे दर कोसळले; जाणून घ्या, नाफेड, ‘एनसीसीएफ’ कांद्याची विक्री कधी, कुठे करणार

‘देवाने मला काही विशिष्ट उद्दिष्टासाठी पाठवले आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत मी काम करत राहीन,’ असे विधान लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केले होते. त्या पार्श्वभूमीवर, ‘मी देव आहे, अशी भावनाही काही जणांना जाणवत आहे. मात्र, तुमच्यातील देवत्व लोकांनी ठरवावे. माझ्याबाबत कोणी असे शब्द उच्चारले, तर मी ते कानापर्यंत येऊ देतो. पण, ते मनापर्यंत पोहोचू देत नाही,’ असे भागवत यांनी म्हटल्याने त्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

‘देशभक्ती, विविधता ही देशाची बलस्थाने आहेत. देशभक्ती अधूनमधून झोपी जाते. मात्र, चटका बसला, की ती जागृत होते. देश म्हणून आपण एक आहोत, ही भावना महत्त्वाची आहे, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. महापुरुषांकडून प्रेरणा घेऊन खारीचा वाटा उचलणारे कार्यकर्ते हवे आहेत. अखंडित कार्य करताना ते पणतीसारखे असले पाहिजे. वीज चमकून गेल्यानंतर काही काळ अंधार होतो. पणती मात्र तेवत रहाते. चमकून डोक्यात जाण्यापेक्षा पणती म्हणून तेवत राहावे लागणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

भागवत म्हणाले, ‘देशभक्ती, संस्कृती आणि बलिदान ही भारतीयांना जोडणारी त्रिसूत्री आहे. मात्र, अजूनही देशाला उर्जितावस्था यायला वेळ आहे. पुढील एक-दोन पिढ्या यासाठी कार्य करावे लागेल. मात्र या उर्जितावस्था, उन्नती काही शक्तींना नको आहे. देशाचा उत्कर्ष ज्यांना नको आहे, अशा शक्ती सर्व काही ओरबडण्याचा प्रयत्न करत आहेत.’

हेही वाचा – पशुसंवर्धनची जमीन एमआयडीसीला देण्यास विरोध केल्यामुळे कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली ?

पूर्व सीमा विकास प्रतिष्ठानचे समन्वयक श्रीपाद दाबक यांनी प्रास्ताविक केले. सुधीर जोगळेकर यांनी भय्याजी काणे यांचा जीवनपरिचय करून दिला. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

‘कठीण परिस्थितीतही मणिपूरमध्ये संघ कणखरपणे उभा’

‘मणिपूरमधील कठीण परिस्थितीतही रा. स्व. संघाचे स्वयंसेवक कणखरपणे उभे आहेत. संताप, क्रोध, द्वेष विसरून नागरिकांतील संघर्ष थांबावा म्हणून सर्व घटकांशी संवाद साधत आहेत. गेली ४० ते ५० वर्षे समर्पित वृत्तीने कार्य करणारे संघ स्वयंसेवक आणि इतर संघटनांमुळेच पूर्वांचलाची स्थिती आज सुधारत आहे,’ असे डाॅ. मोहन भागवत यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘मणिपूरमधील द्वेषाची आग भडकू न देता शांत करता आली पाहिजे. ही परिस्थिती कशी बदलवता येईल, याचा कृतीशील विचार आवश्यक आहे.’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not say that you have become god statement by rss mohan bhagwat pune print news apk 13 ssb