Heavy Rain Alert Pune : पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय आता कार्यालये, कंपन्यांच्या ऑफिसेसच्या कामकाजासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.
गेले काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. विशेषतः घाट माथ्यावर आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर जास्त आहे. त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्याबरोबरच आता पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातही गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याचे दिसून येत आहे.
हवामान विभागाने आज (२५ जुलै) जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांना सुटी जाहीर केली आहे.
हे ही वाचा… Pune Heavy Rain : खडकवासला धरणसाखळीत विक्रमी पाऊस, पुणे शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली
पुणे शहरातील शासकीय कार्यालयांना सुटी नाही. इतर आस्थापनांना आवश्यकतेनुसार सुटी देण्यात यावी आणि आवश्यकतेनुसार ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.