जीवनात आनंदी रहायचे असल्यास जे काम आवडेल ते करा, असे आवाहन माजी सनदी अधिकारी डॉ. किरण बेदी यांनी आकुर्डी येथे बोलताना केले. कोणतेही कार्य फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य म्हणून केल्यास समाज त्याची नोंद घेतो, असेही त्या म्हणाल्या.
आकुर्डीतील डी. वाय. पाटील महाविद्यालय आयोजित ‘सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट’ या विषयावरील कार्यशाळेत ‘नेतृत्वगुण-यशाची गुरूकिल्ली’ या विषयावर त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, संचालक एस. के. जोशी, प्राचार्य डॉ. दिनेश खैरनार आदी उपस्थित होते.
बेदी म्हणाल्या, परदेशातील शिक्षणाचे आपण अनुकरण करतो. मात्र, आपल्या शिक्षणात मूल्य व जीवन जगण्याचे शिक्षण दिल्यास मोठे परिवर्तन होईल. लोकसंख्या, भ्रष्टाचारासारखी अनेक संकटे व आव्हाने आहेत. त्यांना तोंड देण्याची क्षमता प्रत्येकामध्ये आहे. मात्र, ती क्षमता आपल्याला ओळखता येत नाही. विद्यार्थ्यांमधून उद्याचे नेतृत्व निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी योगदान दिले पाहिजे. मनोरंजन, वाचन, सत्संग, व्यायाम, गायन, समाजसेवा, खेळ आदींमधून ऊर्जा मिळते, असेही त्या म्हणाल्या.

Story img Loader