डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा क्षेत्रातील व्यक्तींवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल कायदा असूनही अनेक पोलिस चौक्यांमध्ये पोलिसांना त्याची फारशी माहिती नसल्याचा अनुभव डॉक्टरांनी नोंदवला आहे. आपल्या बाबतीत अशी एखादी घटना घडल्यास पुढील संभाव्य अडचण टाळण्यासाठी डॉक्टरांनी कायद्याची प्रत आपल्या संगणकावर बाळगावी आणि ती घेऊनच पोलिसांची मदत घेण्यास जावे, असा सल्ला डॉक्टर संघटनांकडून दिला जात आहे.
नजीकच्या काळात पुण्यात हडपसर आणि कोंढव्यात रुग्णांच्या संतप्त नातेवाइकांकडून डॉक्टरांवरील हल्ला व रुग्णालयातील तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. राजगुरुनगर, खेड आणि जुन्नर येथेही डॉक्टरांना दमदाटी करण्याचे प्रकार झाले असल्याची माहिती काही डॉक्टरांनी दिली. ‘डॉक्टर्स डे’च्या (१ जुलै) निमित्ताने ‘लोकसत्ता’ने याविषयी डॉक्टरांशी संवाद साधला. बालरोगतज्ज्ञ आणि ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या पुणे शाखेचे प्रवक्ते डॉ. जयंत नवरंगे म्हणाले, ‘डॉक्टरांनी रुग्णाच्या आजारावर तत्परतेने व योग्य उपचार करणे गरजेचेच आहे, त्यात निष्काळजीपणा होता कामा नये, परंतु वैद्यक शास्त्रालाही मर्यादा असतात. पूर्ण प्रयत्न केल्यानंतरही रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाइकांनी परिस्थिती समजून घेणे गरजेचे असून कायदा हातात घेणे योग्य नव्हे. अनेकदा रुग्णाच्या नातेवाइकांपेक्षा रुग्णाच्या मृत्यूनंतर उपस्थित राहिलेल्या व्यक्तींकडून असा प्रकार घडताना दिसतो. डॉक्टरांवरील हल्ले सर्वसाधारणत: बिलाच्या कारणावरून होत नसून रुग्णाचा मृत्यू होणे किंवा मृत्यूच्या कारणाचे निदान होत नसल्यामुळे डॉक्टरने शवविच्छेदन करण्यास सांगणे यावरून होत असल्याचेही दिसते. याविषयीच्या कायद्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना माहिती असली, तरी पोलिस चौक्यांमध्ये गेल्यावर तिथे पोलिसांना हा कायदा ठाऊक नसल्याचा अनुभव डॉक्टरांना येतो.’
डॉक्टरांवरील हल्ल्यांसंबंधीचा कायदा ‘महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था – हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान यांना प्रतिबंध कायदा- २०१०’ या नावाने ओळखला जातो. या कायद्यानुसार आरोप सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा तसेच पन्नास लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. रुग्णालयातील तोडफोडीच्या प्रकरणांमध्ये झालेल्या नुकसानीच्या दुप्पट रकमेइतकी नुकसानभरपाई वसूल करण्याचीही तरतूद त्यात आहे.
हल्लासदृश परिस्थिती हाताळण्यासाठी आयएमएकडून
डॉक्टरांच्या ‘रश टीम’ तयार करण्याचा प्रस्ताव
रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर किंवा रुग्णालयावर हल्ला होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यावर तत्काळ जागेवर पोहोचून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांच्या ‘रश टीम’ तयार करण्याचा आयएमएच्या पुणे शाखेचा प्रस्ताव आहे. पुण्याच्या चार झोनमध्ये अशा १२ रश टीम तयार करण्याचे विचाराधीन असून त्यात सहभागी होण्यासाठी संघटनेच्या ‘आयएमए प्लस’ या मासिकातून आवाहन करण्यात आले आहे.
डॉक्टरांवरील हल्ल्यासंबंधी कायद्याची पोलिस चौक्यांमध्ये माहितीच नाही
डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा क्षेत्रातील व्यक्तींवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल कायदा असूनही अनेक पोलिस चौक्यांमध्ये पोलिसांना त्याची फारशी माहिती नसल्याचा अनुभव डॉक्टरांनी नोंदवला आहे.
First published on: 01-07-2015 at 03:06 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor attack medical hospital