पुण्यात वडील आणि आजोबांचं निधन झालं असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी सुट्टी न दिल्याने महापालिकेतील एका डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. पालिकेने या डॉक्टरचा २ महिन्यांपासून १० हजार रुपये पगार देखील कापल्याचा आरोप झालाय. याच तणावातून या डॉक्टरने आज (१७ डिसेंबर) महानगर पालिकेच्या गेटवर अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. महेंद्र अच्युतराव चाटे असं आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. महेंद्र चाटे हे महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात कंत्राट पद्धतीवर १ वर्षांपासून रुजू आहेत. त्यांच्या वडिलांचे तीन महिन्यांपूर्वी निधन झालं, मात्र तेव्हा संबंधित प्रशासनाने त्यांना अंत्यसंस्कार किंवा अंत्यविधीसाठी सुट्टी दिली नाही, अशी माहिती गुन्हे पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांनी दिली.
हेही वाचा : धक्कादायक, २०२० मध्ये शेतकऱ्यांपेक्षाही अधिक व्यावसायिकांच्या आत्महत्या, आकडेवारीतून उघड
“२ महिन्यांपासून पीडित डॉक्टरच्या पगारातून १० हजार रुपयांची कपात”
गंभीर बाब म्हणजे ३ दिवसांपूर्वी आजोबांचं निधन झालं, तेव्हा देखील डॉ. महेंद्र चाटे यांना सुट्टी देण्यात आली नाही. त्याचबरोबर २ महिन्यांपासून त्यांचा १० हजार रुपये पगार कापला जात आहे. याच तणावातून त्यांनी महानगर पालिकेच्या गेटवर अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तेथील सुरक्षा रक्षकांनी तात्काळ त्यांना थांबवलं. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळली, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली.