‘सरकारी काम, जरा थांब..’ असा अनुभव रोजच अनेक नागरिकांना येत असतो. पण, त्याबरोबरीनेच ‘चिरीमिरीचे दाम, लगेच होईल काम..’ हाही अनुभव अनेकांना मिळाला असेल. शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असणाऱ्या एक डॉक्टरांनीही हा अनुभव इतरांना देण्याचे ठरविले व चक्क एका पोलीस हवालदारालाच लाच मागितली. हवालदाराच्या वैद्यकीय प्रमाणपत्राचे काम करून देण्यासाठी डॉक्टरला साडेतीनशे रुपयांचा मोह झाला अन् हाच मोह त्याला गजाआड घेऊन गेला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी केलेल्या कारवाईत या डॉक्टरला रंगेहात पकडण्यात आले. त्यामुळे ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा’ अशीच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यापूर्वीही विविध शासकीय अधिकारी व पोलीस खात्यातील अनेकांना रंगेहात लाच घेताना पकडले आहे. काही राजकीय नेत्यांचाही त्यात सहभाग आहे. तपासात गुन्हा निष्पन्न झालेल्यांना न्यायालयाने शिक्षाही ठोठावल्या आहेत. मात्र, लाचखोरीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. काहींना लाखाची, तर काहींना हजारोंची लाच घेताना पकडण्यात आले आहे. पण, लाच साडेतीनशे रुपयांची का असेना, तो गुन्हाच ठरत असल्याचे डॉक्टरच्या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
डॉ. नामदेव लक्ष्मण पाटील, असे कारवाई झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. पाटील हे राज्य राखीव पोलीस दलाच्या रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणातील तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक दोनमध्ये हवालदार या पदावर कार्यरत आहेत. सध्या ते वैद्यकीय रजेवर आहेत. मात्र, तब्येत अद्यापही ठीक नसल्याने त्यांना वैद्यकीय रजा वाढवून घ्यायची होती. त्यामुळे त्यांनी पोलीस दलाचे रुग्णालय गाठले व पाटील यांच्याकडे वैद्यकीय रजा वाढवून देण्याची मागणी केली. त्यामुळे हवालदारांनी याची तक्रार थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली.
हवालदारांकडून आलेल्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांची पडताळणी केली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी सापळा लावला. हवालदाराकडून साडेतीनशे रुपयांची रक्कम लाच म्हणून स्वीकारताना पाटील यांना रंगेहात पकडण्यात आले. त्या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. अशा प्रकारे शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन या विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्कासाठी
– अॅन्टी करप्शन ब्युरो हेल्पलाइन- १०६४
– दूरध्वनी क्रमांक- ०२०-२६१२२१३४, २६१३२८०२, फॅक्स- २६१२१४०३
– अपर पोलीस अधीक्षक, अर्जुन सकुंडे- ९९२३६०७०७०
– सहायक पोलीस आयुक्त, श्रीहरी पाटील- ९४२०९०४९००
साडेतीनशे रुपयांचा मोह डॉक्टरला घेऊन गेला गजाआड!
चक्क पोलीस हवालदारालाच मागितली लाच
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-09-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor bribe crime anti corruption bureau