लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली.

डॉ. उन्मेष सोपान गुट्टे (वय ५४) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदाराच्या मित्राला त्याच्या वडिलांचे कुलमुखत्यारपत्र तयार करायचे होते. परंतु, मित्राचे वडील ब्रेन हॅमरेजमुळे अंथरुणाला खिळले असल्याने ते रजिस्टर ऑफिसमध्ये प्रत्यक्ष हजर राहू शकत नव्हते. त्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक होते. या प्रमाणपत्रासाठी तक्रारदाराने प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे येथे जाऊन डॉ. उन्मेष गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागितली.

याबाबत तक्रारदाराने १७ मार्चला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानंतर, १८ मार्चला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे येथे डॉ. गुट्टे यांना पंचांसमक्ष लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

कायदेशीर कारवाई सुरू

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उपआयुक्त तथा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.