फॅमिली डॉक्टरांचा पूर्वीच्या काळी असलेला कौटुंबिक जिव्हाळा आता हरवला असून ‘हॉस्पिटल’ची केवळ ‘हॉस्पिटॅलिटी सव्‍‌र्हिस’ झाली असल्याचे मत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.
एरंडवण्यातील ‘एस हॉस्पिटल’ येथील ‘थ्री- डी लॅप्रॉस्कोपी’ विभाग तसेच मल्टिस्पेशालिटी सेवांचे पाटील यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. अरूण जामकर, पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, रुग्णालयाचे प्रमुख डॉ. सुरेश पाटणकर या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ‘‘पूर्वी आजोबांपासून नातवंडांपर्यंत असा कुटुंबाचा एकच डॉक्टर असे. अशा डॉक्टरांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याची आज गरज आहे. डॉक्टरांनी तपासल्याबरोबर रुग्णाला बरे वाटू लागत असे. असा ‘हात’गुण आता हरवला आहे. घराघरात परंपरेने चालत आलेल्या वैद्यकीय ज्ञानात काहीतरी तथ्य आहेच. हे उपलब्ध ज्ञान सिद्ध करता आले तर ते मोठय़ा प्रमाणावर वापरले जाऊ शकेल.’’
अनेक आयुर्वेदिक औषधांवर संशोधन होण्याची गरज असल्याचे मत डॉ. जामकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘आयुर्वेदातील सर्व बाबी शास्त्रोक्त पद्धतीने स्द्धि करणे आवश्यक आहे. आयुर्वेद, सिद्ध, युनानी या उपचारपद्धतींमध्ये अनेक महत्वाची औषधे असून ती संशोधनाद्वारे सिद्ध झाल्यास जागतिक पातळीवर देशाच्या अर्थव्यवस्थेस बळकटी आणू शकतील.’’
या वेळी ‘आरोग्यसेवा मेडिकल अकॅडमीऑफ इंडिया’तर्फे डॉ. जामकर यांच्या हस्ते रुग्णालयात ‘इंटिग्रेटेड अँड ट्रान्सडिसिप्लिनरी रीसर्च सेंटर’चे उद्घाटन करण्यात आले. तसेच देशमुख यांच्या हस्ते मुतखडा व प्रोस्टेट ग्रंथीच्या विकारांवर काम करणाऱ्या अत्याधुनिक उपचार केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा