मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीला भरधाव कारने उडवल्याची घटना समोर आली असून त्या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना पाच मार्च रोजी पहाटे सहाच्या सुमारास घडली आहे. अपघात अत्यंत भीषण होता, सुदैवाने यात डॉक्टर असलेले बळीराम बाबा गाढवे वय- ४७ रा. केशव नगर चिंचवड हे बचावले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फरार कार चालकाचा शोध वाकड पोलिस घेत आहेत.
व्हिडिओ >
गंभीर जखमी असलेले डॉ. बळीराम गाढवे हे चिंचवड केशव नगर येथे राहण्यास आहेत. तिथून ते पायी चालत काळेवाडी बीआरटी मार्गा पासून जात होते. तेव्हा, पाठीमागून भरधाव आलेल्या कारने त्यांना भीषण धडक दिली. धडक बसल्यानंतर ते थेट रस्त्यावर आपटले यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फॅक्चर झाला आहे. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा अपघात आहे की घातपात याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे. मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन रस्त्याच्या कडेने चालावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.