‘भारताचा विकास होण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आवश्यक असून आपल्या शिक्षण पद्धतीत प्राथमिक शिक्षणापासूनच बदल करणे गरजेचे आहे. कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची सध्या जगाला आवश्यकता आहे,’ असे मत इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी मंगळवारी व्यक्त केले.
भारती विद्यापीठाच्या सतराव्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मूर्ती बोलत होते. यावर्षी विद्यापीठाकडून मूर्ती आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्सेस’ हा सन्मान देण्यात आला. या वेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा नियंत्रक डॉ. विश्वास धाप्ते आदी उपस्थित होते. यावर्षी ३० विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि ७७ विद्यार्थ्यांना पीएच.डी देण्यात आली.
या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मूर्ती म्हणाले, ‘‘जगाचे लक्ष भारत वेधून घेत असला तरीही अद्याप भारतातील आर्थिक, सामाजिक दरी अजून तशीच आहे. मानवी विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक खालचा आहे. भारताचा विकास हा मनुष्यबळाच्या व्यवस्थापनावर अवलंबून असून कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आपल्याला आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षणपद्धतीत बदल करणे आवश्यक असून ते प्राथमिक शिक्षणापासूनच होणे गरजेचे आहे. देशाला समथ्र्यशाली बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे. सकारात्मक ऊर्जेतूनच यशाचा मार्ग सापडत असतो.’’
या वेळी डॉ. माशेलकर म्हणाले, ‘‘संधींची वाट न पाहता स्वत: संधी निर्माण करा. सातत्याने नवे निर्माण करण्याचा ध्यास घ्या. जगाच्या पाठीवर भारताने नवनिर्मितीचा ध्यास घ्यायला हवा.’’

Story img Loader