डॉक्टरांनी रुग्णांला लिहून देण्याचे ‘प्रिस्क्रिप्शन’ (डॉक्टरांची चिठ्ठी) कसे असावे याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने ‘मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया’ला केलेल्या काही सूचना मान्य होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येक प्रिस्क्रिप्शनसाठी ए-५ आकाराचा कागद वापरण्यापेक्षा आता लहान आकाराच्या कागदावरही प्रिस्क्रिप्शन लिहिता येणार आहे.
आयएमएचे राज्याचे अध्यक्ष डॉ. दिलीप सारडा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आएमएच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. अरुण हळबे आणि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. डॉ. सारडा म्हणाले, ‘‘डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन कसे लिहावे याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दल मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने सुधारणा व आक्षेप नोंदवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आयएमएने सुधारणा सुचवल्या असून त्यातील काही मान्य होण्याच्या मार्गावर आहेत. यात प्रिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी २४ बाय ११ आकाराच्या (ए-५) कागदाबरोबरच एखादेच औषध लिहून द्यायचे असल्यास १४ बाय ११ या आकाराचा लहान कागदही वापरण्याची मुभा असेल. तसेच प्रिस्क्रिप्शनवर सरसकट सर्व रुग्णांचे वजन न नोंदवता केवळ लहान मुलांचेच वजन लिहावे लागेल. रुग्णाचा पत्ता, मोबाइल क्रमांक, लँडलाइन क्रमांक आणि ई-मेल पत्ता ही सर्व माहिती न लिहिता यातील काहीतरी एक लिहून चालू शकणार आहे. मात्र डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन ‘कॅपिटल’ अक्षरांमध्येच लिहावे हे मार्गदर्शक तत्त्व तसेच राहणार आहे.’’
नवीन सुधारणांसह येत्या १ ऑगस्टपासून प्रिस्क्रिप्शनची नवी मार्गदर्शक तत्त्वे लागू होऊ शकतील, असेही डॉ. सारडा म्हणाले. 

Story img Loader