पुणे : कानातील रक्तवाहिन्यांमध्ये क्वचित आढळणाऱ्या आणि आव्हानात्मक स्वरूपाच्या आजाराने एक तरुण ग्रस्त होता. त्याच्यावर डॉक्टरांनी प्रगत स्वरूपाच्या एम्बोलायझेशन प्रक्रियेसह अत्याधुनिक स्टेरिओटॅक्टिक रेडिओसर्जरीद्वारे यशस्वीपणे उपचार केले. ही उपचारपद्धती जटिल विकारांसाठी विकसित करण्यात आली आहे.

हा ३० वर्षीय रुग्ण एप्रिल २०२२ मध्ये हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेला होता. तेव्हा त्याच्या उजव्या कानाला सूज, लालसरपणा आणि अधूनमधून रक्तस्राव अशी लक्षणे जाणवत होती. सुरुवातीला केलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये आर्टेरिओव्हेनस मालफॉर्मेशनचे (एव्हीएम) निदान झाले. रुग्णाच्या एव्हीएमचे व्यवस्थापन करण्यासाठी एप्रिल २०२२ मध्ये एम्बोलायझेशनची प्रक्रिया प्रथम करण्यात आली. यात रक्तवाहिन्यांमार्फत एक घटक पदार्थ सोडला जातो आणि त्याद्वारे विचित्र जोडण्या बंद केल्या जातात. त्यामुळे रक्तस्रावाचा धोका, तसेच अन्य लक्षणेही कमी होतात. एम्बोलायझेशननंतर रुग्णामध्ये थोडी सुधारणा दिसून आली.

रुग्णाला डिसेंबर २०२२ मध्ये लक्षणे पुन्हा दिसू लागली. त्यामुळे पुन्हा एकदा एम्बोलायझेशन करून त्यानंतर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय वैद्यकीय पथकाने घेतला. २९ डिसेंबर २०२२ रोजी त्रासदायक पेशी काढून टाकून संबंधित भागाची नव्याने रचना करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. एम्बोलायझेशन आणि शस्त्रक्रिया अशा दुहेरी उपचारांमुळे रुग्णाच्या स्थितीत सुधारणा झाली. त्यातून एव्हीएमचे प्रमाण ६० ते ७० टक्क्यांनी कमी झाले. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये रुग्णाला पुन्हा एकदा सौम्य स्वरूपात लक्षणे जाणवू लागली.

अखेर सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉ. संजय एम. एच. यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने स्टेरिओटॅक्टिक रेडिओ सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. या अत्यंत नेमक्या रेडिओथेरपी तंत्रामध्ये एकाग्र रेडिएशन किरणांद्वारे एव्हीएमला लक्ष्य केले जाते आणि आजूबाजूच्या निरोगी पेशी या किरणांच्या संपर्कात कमीत कमी येतील, याची काळजी घेतली जाते. यासाठी एलेक्टा सिनर्जी प्रणालीचा उपयोग करण्यात आला. हे उपकरण अत्यंत नेमकेपणाने रेडिएशन करण्याच्या क्षमतेसाठीच ओळखले जाते. या उपचारपद्धतीमुळे कानाचे कार्य आणि बाह्यस्वरूप नियमित राखण्यात मदत होऊन अधिक चिरफाड करण्याची गरज भासली नाही.

एव्हीएम म्हणजे काय?

आर्टेरिओव्हेनस मालफॉर्मेशन (एव्हीएम) हा अतिशय गुंतागुंतीचा विकार आहे. यामध्ये रक्तवाहिन्या विचित्र पद्धतीने जोडलेल्या असतात आणि त्यामुळे सामान्य रक्ताभिसरणात अडथळे येतात. या विकारावर वेळेत उपचार झाले नाहीत, तर त्यातून गंभीर स्वरूपाची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. यामुळे रक्ताभिसरणावर ताण येऊन हृदयाच्या कामात बिघाड होण्याचा धोकाही असतो.