सर्वसाधारपणे रुग्णावरील अवयव प्रत्यारोपणासाठी समान रक्तगट असलेला (एबीओ) दाता आवश्यक असतो. त्यावर मात करीत एका रुग्णावर यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. भिन्न रक्तगट असूनही ही शस्त्रक्रिया पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वी केली आहे. यकृताचा आजार असलेल्या पित्याला मुलीनेच अवयवदान करून त्याला नवजीवन दिले आहे.
हेही वाचा >>> सावधान! राज्यात डोळ्यांच्या साथीचे आठ दिवसांत दोन लाख रुग्ण
सोलापूर येथील ५२ वर्षीय रिक्षाचालकाला यकृताचा कर्करोग झाला होता. यावर मात करण्यासाठी त्याला तातडीने यकृत प्रत्यारोपणाची गरज होती. मात्र, एबीओ जुळत असलेले दाते मिळत नव्हते. त्यावेळी परिचारिका असलेली त्यांची २५ वर्षांची मुलगी प्रत्यारोपणासाठी पुढे आली. तिचा रक्तगटही वडिलांशी जुळत नव्हता. रुग्णाचा रक्तगट ओ प्रकारातील आहे, तर यकृत दिलेल्या मुलीचा रक्तगट ए प्रकारातील आहे. सह्याद्री रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. बिपीन विभुते यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय पथकाने रुग्णावर यशस्वीपणे यकृत प्रत्यारोपण केले. भिन्न असलेल्या रक्तगटामुळे प्रतिकारकतेच्या प्रतिक्रियेवर मात करणे हे प्राथमिक आव्हान होते. हे आव्हान पथकाने यशस्वीरीत्या पार पाडले. शस्त्रक्रियेनंतरच्या तपासणीत रुग्णाचे यकृत व्यवस्थित काम करत असल्याचे दिसून आले.