सुटय़ांमुळे मुंबई, ठाणे, पुण्यात वाढता प्रतिसाद
सुटय़ांमुळे पर्यटकांना हॉटेल्स, रिसॉर्ट्स इथे जागा मिळणे जसे कठीण झाले आहे, तसेच पाळीव प्राण्यांच्या हॉस्टेल्स, बोर्डिग येथे पाळीव प्राण्यांनाही सध्या जागाच मिळत नसल्याचे दिसत आहे. एखाद्या पंचतारांकित हॉटेलप्रमाणे पाळीव प्राण्यांसाठी सुविधा देणारी हॉस्टेल्स, पाळणाघरे, बोर्डिग्सना प्राणीप्रेमींकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे, मुंबई, ठाणे यांबरोबरच नागपूर, नाशिक, कोल्हापूर येथेही आता ‘पेट हॉस्टेल्स’ची नवी प्रथा रूजत असल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्याच्या सुटीत गावाला जायचे म्हणजे घरी पाळलेल्या कुत्र्याला एक तर बरोबर घेऊन जायचे किंवा ओळखीचे प्राणीप्रेमी, शेजारी यांना विनंती करून कुत्र्यांच्या खाण्यापिण्याची तात्पुरती सोय करायची, असा प्रघात अनेक वर्षे होता. मात्र आता गावी जाण्याबरोबरच घरी काही कार्यक्रम असेल तर घरातील पाळीव प्राण्यांना कुठे ठेवायचे, असा प्रश्न बदलत्या जीवनशैलीनुसार अधिक प्रमाणात पडू लागला आणि त्याचे उत्तर ‘पेट हॉस्टेल्स’, ‘पेट बोर्डिग्स,’ ‘पेट रिसॉर्ट्स’ ने दिले. ‘पेट सव्‍‌र्हिस इन्डस्ट्री’मधील हा नवा व्यवसाय इतका रुजला की आता या बोर्डिगसाठीही किमान महिनाभर आधी नोंदणी करावी लागत आहे. सध्या तर सुटय़ांमुळे पेट बोर्डिगमध्ये जागाही मिळेनाशी झाली आहे.
मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी अगदी १० ते १२ प्राण्यांपासून ते १०० प्राण्यांची एका वेळी सोय करणारी पेट बोर्डिग्स आहेत. कुत्र्याच्या प्रजातीनुसार त्याला ठेवण्याचे भाडे ठरते. साधारण ४०० रुपये दर दिवशी ते अगदी दोन हजार रुपये दर दिवशी मोजूनही प्राणीप्रेमी पेट हॉस्टेल्सकडे धाव घेत आहेत. स्वतंत्र वातानुकूलित खोल्या, हव्या त्या ब्रँडचे खाणे, आजारी प्राण्यांसाठी किंवा विशिष्ट प्रजातींसाठी खाण्याच्या काही विशेष गरजा असतील तर त्या पुरवणे, खेळण्यासाठी जागा अशी सगळी कौतुके ही हॉस्टेल्स पुरवितात. ऑनलाइन, व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून नोंदणीच्या सुविधाही आहेत. जागेअभावी ही हॉस्टेल्स शहरापासून दूर आहेत. त्यामुळे प्राण्यांना घरून नेण्याची आणि ठरलेल्या दिवशी आणून सोडण्याची सोयही काही हॉस्टेल्स करतात.
याबाबत ठाण्यातील ‘अप्सन कॅनाईन रिसॉर्ट’च्या अपर्णा कदम यांनी सांगितले की, ‘आमच्याकडे शंभर प्राणी एकावेळी राहू शकतात. साधारणपणे एक ते दीड महिना आधीपासून नोंदणी झाली आहे. नवा कुत्रा किंवा मांजर असेल, तर ते राहते का हे पाहण्यासाठी आम्ही काहीवेळा एखाद दिवस आधी त्याला ठेवूनही पाहतो. एरवीही या सुविधेला लोकांकडून खूप प्रतिसाद मिळतो. सुटय़ांमुळे अधिक प्रतिसाद आहे.’

मांजरघरांना वाढती मागणी!
गेल्या काही वर्षांमध्ये कुत्र्यांबरोबरच मांजरांसाठीच्या हॉस्टेल्सचीही मागणी वाढली आहे. याबाबत पुण्यातील ‘पेट सीटर्स’च्या शीतल मुंदडा यांनी सांगितले की, ‘सध्या मांजरांसाठीच्या हॉस्टेल्सचीही मागणी वाढली आहे. मांजरे पळून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी हॉस्टेल्सची सुविधा तुलनेने कमी आहे. मात्र पर्शिअन, बॉबटेल सारख्या प्रजातींची मांजरे पाळण्याकडे गेली दोन-तीन वर्षे कल वाढला आहे. त्यामुळे मांजरांसाठी हॉस्टेल्सचीही विचारणा सातत्याने होत असते.’

Story img Loader