श्वानांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची दखल

बॉम्बशोधक आणि नाशक पथकातील (बीडीडीएस) श्वानांवर पडणारा ताण विचारात घेऊन त्यांच्या निवृत्तीचे वय निश्चित करण्यात आले आहे. या पुढील काळात बॉम्बशोधक नाशक पथकातील आठ वर्षे पूर्ण केलेल्या श्वानांचा पुढे वापर करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यातील पुणे, मुंबई ही शहरे दहशतवादी हल्यांचे लक्ष्य ठरली आहेत. संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर बॉम्बशोधक पथकातील श्वानांकडून संवेदनशील ठिकाणांची दररोज सकाळी आणि सायंकाळी पाहणी करण्यात येते. बॉम्बशोधक पथकातील प्रशिक्षित पोलीस आणि त्यांच्या पथकातील श्वान नियमितपणे ‘हिटलिस्ट’वरील किंवा संवेदनशील स्थळांची पाहणी करतात. बॉम्बशोधक पथकातील श्वान आणि इतर गुन्ह्य़ांच्या तपासात पोलिसांना साहाय्य करणाऱ्या श्वानांच्या कामात मूलभूत फरक असतो. बॉम्बशोधक पथकातील श्वानांवर पडणारा ताण जास्त असतो. तसेच महत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तासाठी या श्वानांचा वापर करण्यात येतो.

सभा, समारंभांच्या जागांची पाहणी करण्यासाठी याच श्वानांचा वापर केला जातो. गणेशोत्सवात बॉम्बशोधक पथकातील श्वानांवर अतिरिक्त जबाबदारी पडते. साहजिकच गुन्हे शाखा तसेच अमली पदार्थविरोधी पथकातील श्वानांच्या तुलनेत या श्वानांची दमछाक लवकर होते. त्यामुळे बॉम्बशोधक पथकातील श्वानांचे वय निश्चित करण्यात आले आहे. या पुढील काळात आठ वर्षांपुढील श्वानांचा वापर करायचा नाही, असे आदेश नुकतेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राज्य पोलीस दलातील बॉम्बशोधक पथकांना दिले असल्याची माहिती बॉम्बशोधक पथकातील सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या संदर्भात पुण्यातील रामटेकडी येथील महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनीत नुकतीच एक बैठक पार पडली होती.

बॉम्बशोधक पथकातील श्वान यापूर्वी दहा वर्षांपर्यंत काम करायचे. बॉम्बशोधक पथकासाठी लॅब्रोडोर जातीचे श्वान उपयुक्त असतात. अन्य जातीच्या श्वानांच्या तुलनेत लॅब्रोडोर श्वानांची कार्यक्षमता चांगली असते. केनल क्लबकडून श्वानांची पिल्ले खरेदी केली जातात. त्यानंतर त्यांना पथकातील प्रशिक्षित पोलिसांकडून (हँडलर) प्रशिक्षण दिले जाते. अशा प्रकारच्या श्वानांना लहानपणापासून स्फोटके हुडकून काढण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता अन्य श्वानांच्या तुलनेत जास्त असते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून श्वानांची नियमित तपासणी करण्यात येते. आठ वर्षांपर्यंत काम करणाऱ्या श्वानांची कार्यक्षमता तपासण्यात येते. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर श्वानांना निवृत्ती देण्यात येते. पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकात सध्या बारा हँडलर आहेत. प्रत्येक श्वानासाठी दोन हँडलरची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचे संगोपन करण्याचे काम हँडलरवर सोपवण्यात येते.

 ‘आझाद’ निवृत्त..

बॉम्बशोधक पथकातील श्वानांचे कामाचे वय निश्चित करण्यात आल्यानंतर पुणे पोलिसांच्या पथकातील आझाद नावाच्या श्वानाला आठवडय़ापूर्वी निवृत्ती देण्यात आली. त्याची निवृत्ती पोलिसांसाठी चटका लावणारी ठरली. बॉम्बशोधक पथकातील पोलिसांनी खास कार्यक्रम देखील आयोजित केला होता. पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकात सध्या लिमा, इको, तेजा, सूर्या, टायसन हे श्वान आहेत. आझादच्या निवृत्तीनंतर त्याला बॉम्बशोधक पथकात ठेवण्यात येणार आहे. त्याचे संगोपन तेथेच करण्यात येईल. त्याला पुढील काळात कोणतेही काम देण्यात येणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Story img Loader