४ जानेवारी २०१६ हा दिवस उजाडला तो संपूर्ण देशासाठी तणाव घेऊन. दोनच दिवसांपूर्वी पठाणकोट येथील हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने भारताच्या जुन्या जखमांवरच्या खपल्या काढल्या होत्या. आदल्याच दिवशी हवाईतळावर दहशतवाद्यांचा शोध घेत असताना लेफ्टनंट कर्नल निरंजन यांना वीरमरण आले होते. भारतीय सैन्याच्या तळावर ४ जानेवारीला अडीच वर्षांचा ‘रॉकेट’ प्रशिक्षकाच्या सूचनेबरहुकुम कामगिरी करण्यासाठी तयार झाला होता. भारतीय सैन्याच्या श्वानपथकात साधारण वर्षभरापूर्वी बेल्जियम मॅलेनीज प्रजातीच्या या श्वानाचा समावेश झाला होता. ३०० ब्लॅक कॅप कमांडोज, स्निफर्स, ट्रॅकर्स म्हणजे शोध आणि माग घेणारे श्वान आणि अॅसल्ट डॉग्ज म्हणजे हल्ला करणाऱ्या सहा श्वानांचे पथक हवाईतळाकडे रवाना झाले. त्यात रॉकेटचाही समावेश होता.
हवाईतळावरील अनेक इमारतींना आग लागलेली होती. त्यात गोळीबारदेखील सुरू होता. दोन दिवसांच्या मोहिमेनंतर अद्यापही दोन किंवा तीन दहशतवादी हवाईतळावर लपले असल्याचा भारतीय सैन्याचा अंदाज होता. इमारतींना लागलेल्या आगीमुळे आत शिरणे देखील कठीण झाले होते. अशातच एका इमारतीमध्ये दहशतवाद्याची हालचाल टिपली गेली. आतील दहशतवादी जागा बदलण्याचा प्रयत्न करत होता. माणसाच्या हालचाली, अस्तित्व टिपण्यात आणि स्फोटकांचा शोध घेण्यात रॉकेट तरबेज होता. त्यामुळे रॉकेटला इमारतीत जाण्याचे आदेश त्याच्या प्रशिक्षकाने दिले. रॉकेटने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे दहशतवादी गडबडून गेला. रॉकेटने जायबंदी केल्यामुळे इमारतीतील सुरक्षित जागी जाऊन लपण्याची संधी त्याला मिळाली नाही आणि भारतीय सैन्याच्या गोळीने दहशतवाद्याचा वेध घेतला. एक बॅग घेऊन रॉकेट पळत इमारतीबाहेर निघाला. इमारतीला चहुबाजूने लागलेल्या आगीत रॉकेटचे पाय पोळले मात्र तरीही तो बॅग घेऊन आपल्या प्रशिक्षकाकडे आला. या बॅगमध्ये काही शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि दहशतवाद्यांची ओळख पटवण्यासाठी आवश्यक असलेले पुरावे होते. रॉकेटवर आवश्यक ते उपचार करण्यात आले. तो बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आले. त्याचप्रमाणे त्याला आणि त्याच्या प्रशिक्षकांना ‘सेना मेडल’ही देण्यात आले.
सैन्याच्या श्वानपथकातील ‘मानसी’ या चार वर्षांच्या लॅब्रॅडोर प्रजातीच्या श्वानाचे नावही भारताच्या श्वानविरांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. गेल्या वर्षी सीमेवर झालेल्या गोळीबारात मानसीला आणि तिच्या प्रशिक्षकाला वीरमरण आले. मानसीने सीमेवर होणारी घुसखोरी प्रशिक्षक आणि तळावरील सैनिकांना लक्षात आणून दिली. मानसी सैन्याचा माग काढणाऱ्या श्वानपथकात (ट्रॅकर्स) होती. २०१५ मध्ये आपले प्रशिक्षक बशीर अहमद वर यांच्याबरोबर कूपवाडा परिसरात गस्त घालणाऱ्या मानसीला अनोळखी माणसाच्या हालचालींची चाहूल लागली. तिने प्रशिक्षकांना त्याबाजूला ओढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अतिरेक्यांनी गोळीबार केला. त्यात मानसीला वीरमरण आले. पथकात दाखल झाल्यापासून बशीर अहमद मानसीचे प्रशिक्षक आणि हॅन्डलर होते. मानसीला गोळी लागलेली पाहताच बशीर अहमद यांनी देखील गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. झालेल्या धुमश्चक्रीत त्यांनाही वीरमरण आले. मात्र सैन्याने या परिसरात शोधमोहीम घेऊन घुसखोरांचा नायनाट केला. मानसी आणि तिचे प्रशिक्षक बशीर अहमद या दोघांनाही मरणोत्तर सेना मेडल देण्यात आले.
सीमारक्षणासाठी, हरवलेल्या सैनिकांना शोधण्यासाठी, युद्धाच्या काळात श्वानांनी बजावलेली भूमिका जवानांइतकीच महत्त्वाची ठरली आहे. एखाद्या मोहिमेत येणाऱ्या मानवी मर्यादांच्या पलीकडे जाऊन ही श्वानपथके काम करत असतात. मात्र बहुतेक वेळा सामान्य जगासाठी हे श्वानवीर अज्ञातच राहतात. नुकतेच छत्तीसगडमध्ये एका नक्षलवाद्याचा शोध घेत असताना झालेल्या सुरुंगांच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलातील ‘अमिनिक’ या ‘कोब्रा’ युनिटमधील बेल्जिमय शेफर्ड जातीच्या श्वानाला वीरमरण आले. यापूर्वी अनेक गुन्हेगारांचा आणि स्फोटकांचा शोध घेण्यासाठी अमिनिकने मोलाची कामगिरी केली होती.
दोन दिवसांनी प्रजासत्ताकदिनानिमित्त राजपथावर दिमाखदार संचलन होईल. हे संचलन निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आताही श्वानपथके आपल्यातील नैसर्गिक क्षमता पणाला लावून धोक्याचा शोध घेत असतील. राजपथावरील संचलनातून भारतीय सैन्याचे, सुरक्षा दलांचे सामथ्र्य पुन्हा एकदा जगाला दिसेल. गेल्या वर्षीपासून या संचलनात श्वानपथकाचाही समावेश करण्यात आला आहे. प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सीमेवर आपला जीव पणाला लावून लढणाऱ्या जवानांबरोबरच या ‘श्वानविरांना’ही सलाम!