पुणे : कलावंतांना उतारवयात हक्काचे ठिकाण असावे, या उद्देशाने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि त्यांचे भाचे यशवंत गायकवाड यांनी दोन एकर जमीन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला दान केली आहे. मुळशी तालुक्यात नाणे गाव येथील या जागेत वृद्धाश्रम आणि कलाकारांना सादरीकरणासाठी खुला रंगमंच साकारण्यात येणार आहे.
नाणे गावातील या जागेचा व्यवहार उपनिबंधक कार्यालयात नुकताच पूर्ण करण्यात आला. त्याची कागदपत्रे गोखले यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडे सोमवारी सुपूर्द केली. महामंडळाचे माजी अध्यक्ष व वात्रटिकाकार रामदास फुटाणे, दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी या वेळी उपस्थित होते. उतारवयातील कलाकारांसाठी घेतलेल्या उल्लेखनीय निर्णयाबद्दल गोखले आणि गायकवाड यांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला आला.
आपल्याला मिळणाऱ्या शंभर रुपायतील पंचवीस रुपये आपले नाहीत असे समजून बाजूला ठेवतो आणि कमलाबाई गोखले पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गरजूंना यशाशक्ती मदत करतो. करोना काळात कलाकारांच्या वेदना आणि त्यांची होत असलेली गैरसोय पाहिली. त्यामुळेच उतारवयातील कलाकारांना हक्काची जागा असावी ही जाणीव झाल्याने जमीन देण्याचा निर्णय घेतला.
– विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते