पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार काँग्रेसला गृहीत धरून सुरू असला, तरी त्यांनी काँग्रेसला अशाप्रकारे गृहीत धरू नये, अशा शब्दांमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मंगळवारी पुण्यात सुरू असलेल्या आघाडीतील वादाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर बदलाबाबत काँग्रेसला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतला. तसेच प्रभाग क्रमांक ४० मधील पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला शब्द पाळला नाही, अशी काँग्रेसची तक्रार आहे. या घडामोडींसंबंधी काँग्रेसचे गटनेता आणि महापालिकेतील विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे आणि काही नगरसेवकांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यपद्धतीबाबत या वेळी अनेक तक्रारी करण्यात आल्या. राष्ट्रवादीकडून असे प्रकार सुरू असल्यामुळेच महापौरांच्या राजीनाम्याचे अवलोकन करण्यासाठी जी खास सभा बोलावण्यात आली होती, त्या वेळी सभात्याग केल्याचेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. सत्तेत आघाडी असल्यामुळे अशा प्रकारे परस्पर निर्णय घेतले जाऊ नयेत. तसेच राष्ट्रवादीने अशा प्रकारे काँग्रेसला गृहीत धरू नये, अशी प्रतिक्रिया ठाकरे यांनी या वेळी व्यक्त केली.
याचिकेवर सुनावणी सत्तावीस रोजी
महापालिकेतील विरोधी पक्षनेता पद काँग्रेसला देण्याच्या निर्णयाला मनसेचे गटनेता वसंत मोरे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून या याचिकेकडे पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या याचिकेची पुढील सुनावणी २७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

Story img Loader