‘‘मालेगावच्या मशिदीतील बॉम्बस्फोटामागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे स्पष्ट झाले. पण त्या प्रकरणी मुस्लीम समाजाची १९ मुले ३ वर्षे तुरुंगात पडली होती, त्यांच्या आयुष्याचे काय? काय म्हणून त्यांनी बघायचे या देशाकडे?.. आपल्या कुटुंबातील मुला-मुलींवर अत्याचार झाल्याचा राग मुस्लीम तरुणांच्या डोक्यात शिरला, तर त्याला दोष देता येणार नाही,’’ असे उद्गार काढून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी खळबळ उडवून दिली.
समाजाने, तसेच प्रशासन यंत्रणांनी अल्पसंख्याकांबाबतचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. अशा अन्याय-अत्याचाराच्या घटनांविरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आवाज उठविला पाहिजे. त्यातून मते नाही मिळाली तरी चालतील, असेही ते म्हणाले. िहजवडी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.  
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा उल्लेख करून ते म्हणाले, ‘‘मशिदीत शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला हे ऐकून मला धक्काच बसला. त्यानंतर एका जाहीर भाषणात मी म्हणालो, मुस्लीम समाजातील लोक शुक्रवारी मशिदीत बॉम्बस्फोट करतील हे माझ्या मनाला पटतच नाही. त्यावर या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांना माझ्याकडे पाठविण्यात आले. त्यातील हेमंत करकरे यांनी मला सांगितले की, यामागे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा हात आहे. बॉम्बस्फोटामागे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल श्रीकांत पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांचा हात असल्याचे समोर आले. पोलीस यंत्रणांनी या प्रकरणी १९ मुलांना अटक केली होती. काहीही दोष नसताना ३ वर्षे ती १९ मुले तुरुंगात पडली होती. त्यांच्या आयुष्याचे काय? काय म्हणून त्यांनी बघायचे देशाकडे? आणि अशी वागणूक त्यांना दिल्यामुळे एखाद्या
दिवशी एखाद्याकडून चूक झाली, तर ही देशविघातक शक्ती आहे असे म्हणत संपूर्ण समाज आपण नालायक ठरवायचा? प्रशासन यंत्रणांनी अशा घटनांबाबतचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.’’
दृष्टिकोन बदलला पाहिजे
इशरत जहाँ ही महाविद्यालयात शिकणारी एक ‘इनोसन्ट’ तरुणी होती,  तपास यंत्रणांवरील न्यायालयाच्या देखरेखीमुळे या प्रकरणातील सत्य बाहेर आले. कर्ती मुलगी बळी पडल्याने ते कुटुंब उद्ध्वस्त झाले. आणि परिवारातल्या मुला-मुलींवर अशा प्रकारचा अत्याचार झाला, त्याचा राग एखाद्दुसऱ्या कुटुंबातील मुस्लीम तरुणांच्या डोक्यामध्ये शिरला तर त्याला दोषी धरता येणार नाही. तेव्हा ही व्यवस्था, पद्धती आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समाजातील उपेक्षित, आदिवासी, दीनदलित वर्गात समरस होऊन काम करावे.
मते मिळाली नाहीत तरी चालेल..
तपास यंत्रणांनी दृष्टिकोन बदलायला हवा. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अल्पसंख्याकांवर अन्याय अत्याचार होत असतील तर आवाज उठवावा, त्यामुळे इतरांची मते मिळाली नाही तरी चालेल. मात्र त्यांना त्रास होता कामा नये, उपेक्षित, आदिवासी, दीनदलित वर्गात समरस होऊन काम करा.

Story img Loader