मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चात मतदारांना खूश करण्यासाठी पाठिंबा देऊन नंतर फसवू नका. विरोध असेल तर स्पष्ट बोला, अशी टिपण्णी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी लोकप्रतिनिधींना उद्देशून केली. राणे समितीपुढे आरक्षणाबाबत म्हणणे मांडणार नसाल, तर त्याचा हिशोब निवडणुकीत घेऊ, असे जाहीर करा व सत्ताधाऱ्यांबरोबरच भाजपसह सर्व विरोधी पक्षांना त्यांची भूमिका मांडण्यास सांगा, असे आवाहनही त्यांनी मराठा समाजातील संघटनांना केले.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पुणे शहर व जिल्हा शाखेच्या वतीने ‘शिक्षण, आरक्षण, समाज आत्मपरीक्षण’ या विषयावर आयोजित मेळाव्यात तावडे बोलत होते. कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे, संभाजी ब्रिगेडचे शांताराम कुंजीर, महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, जिल्हाध्यक्ष गुलाबराव गायकवाड, शहराध्यक्ष अनिल मारणे आदी त्या वेळी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, की मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्ये येऊन पाठिंबा देणाऱ्यांच्या मतदार संघामध्ये त्याचे चित्रीकरण दाखविले पाहिजे. मतदारांना खूश ठेवण्यासाठी पाठिंबा दिला असेल, तर ते चालणार नाही, हे त्यांना सांगितले पाहिजे. योग्य दबाब निर्माण करू शकलो, तर आरक्षण पदरात पडेल. त्यामुळे २०१४ ची गाडी चुकवू नका. राजकीय असो किंवा नसो, पण आरक्षणाची खरी गरज शिक्षण व नोकऱ्यांसाठी आहे. भाजपचे सरकार आले, तर आरक्षण मिळणारच.
पत्रकारांशी बोलताना तावडे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची प्रामाणिक इच्छा असेल, तर राणे समितीच्या कामाची गती वाढविली पाहिजे. आरक्षणाची गरज असल्याचे एकीकडे सांगितले जात असताना दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाची अट दाखविली जाते. सरकारची इच्छा असेल, तर कोणाचेही आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण मिळू शकते.
… तर निवडणुकांमध्ये परिणाम दिसतील – संभाजीराजे
मराठा समाजाचा प्रथम ओबीसींमध्ये समावेश करून घ्यावा व त्यानंतर हे आरक्षण किती वाढवायचे, हे ठरवावे. राणे समितीकडून चांगला निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र तसे झाले नाही तर लोकसभा, विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील, असा इशारा युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी दिला. इतर राज्यांमध्ये वाढीव आरक्षण मिळालेले आहे. त्यामुळे सरकारची इच्छा असेल, तर मार्ग निघू शकतो, असेही ते म्हणाले.

Story img Loader