शहरातील रस्ते आणि इतरही अनेक कामांवर कोटय़वधी रुपयांचा खर्च पुन्हा पुन्हा केला जात आहे. अशा प्रकारांना चाप लावावा आणि झालेल्या विकासकामांचे संगणकीय रेकॉर्ड ठेवावे, अशी मागणी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे केली. समाविष्ट गावांमधील बीडीपीवर अतिक्रमण होणार नाही यासाठी कार्यवाही करावी, अशीही मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
महापौर वैशाली बनकर, शहराध्यक्षा, खासदार वंदना चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, सभागृहनेता सुभाष जगताप, म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची सोमवारी आयुक्तांबरोबर बैठक झाली. या बैठकीची माहिती पत्रकार परिषदेत देताना वंदना चव्हाण म्हणाल्या की, एखाद्या रस्त्याचे काम झाल्यानंतर त्याच रस्त्याच्या दुरुस्तीची वा तेथे अन्य काम करण्याची वेळ पाच वर्षांत येता कामा नये. असे होत नसल्यामुळे एकाच कामावर कोटय़वधी रुपयांचा खर्च पुन्हा पुन्हा केला जातो. अनेकदा केवळ निधी संपवण्यासाठी एकाच रस्त्याचे काम पुन्हा केले जाते. असे प्रकार टाळण्यासाठी झालेल्या विकासकामांचे संगणकीय रेकॉर्ड ठेवण्याची पद्धत सुरू करावी, अशी मागणी आम्ही आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करावी, अशीही मागणी आम्ही केली आहे.
बीडीपीवर अतिक्रमण नको
या चर्चेत समाविष्ट तेवीस गावांमधील बीडीपीच्या मुद्यावरही चर्चा झाली. या जागांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर माहिती देताना आयुक्त महेश पाठक म्हणाले की, बीडीपी जागांचे सॅटेलाईट फोटो काढले जाणार असून तेथे अतिक्रमणाचा प्रयत्न झाल्यास तातडीने सूचना देणारी संगणकीय प्रणाली विकसित करून घेतली जाणार आहे. या जागांवर अतिक्रमण होत असेल, तर त्याची माहिती कळवण्यासाठी महापालिकेने दूरध्वनी क्रमांक जाहीर करावा, अशी मागणी या चर्चेत खासदार चव्हाण यांनी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा