‘माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमुळे विद्यापीठाची बदनामी होते, कर्मचाऱ्यांना त्रास होतो, विद्यापीठ जाहिराती देत असल्यामुळे माध्यमे त्यांना हव्या तशा बातम्या प्रसिद्ध करता कामा नयेत’, असे सल्ले देत विद्यापीठाच्या अधिसभेत रविवारी माध्यमांनी बातम्या कशा द्याव्यात, याची ‘शिकवणी’ घेणारा अनाकलनीय ठराव मांडण्यात आला. विद्यापीठाच्या चुका चव्हाटय़ावर आणल्यामुळे होणारी बदनामी थांबवण्यासाठी या ठरावाचा घाट घालण्यात आला आहे.
 ‘विद्यापीठाशी संबंधित कोणत्याही घटनेची सत्यता पडताळूनच त्या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध कराव्यात किंवा नाहीत हे ठरवण्यात यावे. तसेच विद्यापीठाची, अधिकाऱ्यांची आणि सेवकांची विनाकारण बदनामी होईल, अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध करू नयेत आणि अधिकारी किंवा कर्मचारी यांची चूक नसताना जर प्रसिद्धी झाली तर त्या संदर्भातील खुलासा देखील करण्यात यावा,’ असा ठराव चक्क अधिसभेत मांडण्यात आला. अधिसभेच्या सदस्य अरुणा हलगेकर यांनी हा ठराव अधिसभेमध्ये मांडला. फक्त ठराव मांडून हा विषय संपला नाही, तर सूत्रांनी सांगितले, असे म्हणून बातम्या प्रसिद्ध करू नयेत, विद्यापीठाची बदनामी होणाऱ्या बातम्या देऊ नयेत, विद्यापीठ जाहिराती देत असल्यामुळे माध्यमांनी विरोधी बातम्या देऊ नयेत, असे तारेही सदस्यांनी या ठरावावर तोडले. या ठरावावर बोलताना प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ म्हणाले, ‘‘विद्यापीठ वृत्तपत्रांना जाहिराती देते. त्यामुळे वृत्तपत्रांनी विद्यापीठाची बदनामी करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध करणे योग्य नाही.’’ माध्यमांना चुकीची माहिती देणाऱ्या विद्यापीठातील सदस्यांचे काय करायचे असा सवाल डॉ. गजानन खराटे यांनी उपस्थित केला. विद्यापीठाने संपादकांना पत्र लिहून चुकीच्या बातमीचा खुलासा मागावा, असे मतही काही सदस्यांनी मांडले. ‘माध्यमांनी कशा बातम्या प्रसिद्ध कराव्यात हे त्यांचे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे असा ठराव करता येऊ शकत नाही,’ असे मत प्रा. अशोक कांबळे आणि प्रा. मिलिंद वाघ यांनी व्यक्त केले. ‘‘विद्यापीठ हे सार्वजनिक क्षेत्र असल्यामुळे येथे माध्यमांना अटकाव करता येऊ शकत नाही, त्यामुळे असा ठराव करता येऊ शकत नाही. मात्र, या ठरावाची नोंद घेण्यात आली आहे,’’ अशी भूमिका कुलगुरूंनी घेतली. मात्र, असा ठराव अधिसभेच्या कार्यक्रमपत्रिकेत येण्यापूर्वी तो गैरलागू करण्याचे अधिकार कुलगुरूंना आहेत. हे अधिकार वापरले असते, तर हा विषयच पत्रिकेत आला नसता, असे बोलले जात आहे.