ढोलकीच्या तालावर घुंगरांच्या बोलावर…. या गाण्याच्या बोलानुसार अनेकांना ढोलकीच्या ठेक्यावर नाचण्यास व ढोलकीच्या तालावर फेटा उडवण्यास भाग पाडणाऱ्या ढोलकी वादकांवर आता, करोनामुळे उपासमारीची वेळ आल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या ढोलकी वाजवण्याच्या कलेच्या जीवावर गावोगावी जाऊन कार्यक्रमांमध्ये रंगत आणणाऱ्या या ढोलकी वादकांसमोर आता, कुटुंबाच्या पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. करोनामुळे सर्व काही ठप्प झालं आहे. गावोगावच्या जत्रा देखील होत नसल्याने आता पैसा कमावायचा कसा? असा प्रश्न त्यांना पडला आहे. राहत्या गावातही हाताला काम नाही आणि आता पुन्हा ढोलकीवर केव्हा थाप बसेल, याची माहिती नसल्याने ढोलकीवादक हवालदिल झाल्याचे दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आमच्या हाताला काम द्यावं, अशी मागणी चौफुला येथील न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्रातील ढोलकीवाद शंभू डावळकर यांनी लोकसत्ता ऑनलाईनच्या माध्यमातून केली आहे.

यावेळी ढोलकीवाद शंभू डावळकर म्हणाले की, माझ्या वडिलांनी काळू – बाळू, मंगला बनसोडे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांना ढोलकीच्या माध्यमातून साथ देण्याचं काम केले आहे. आता त्यांनी वयाची साठी पार केली असली तरी ते सुनिताराणी बारामतीकर यांच्या सोबत काम करत आहेत. वडिलांबरोबच मी देखील ढोलकी वादनाचे काम करत आहे. आम्ही आजवर एकही दिवस कामाविना बसलेलो नाही. पण मागील चार महिने हाताला काम नसल्याने ढोलकीवर थाप मारलेली नाही. करोनामुळे  कलाकेंद्र बंद असल्याने, गावी आलो आहे. आता चार महिने होत आले आहेत. या दरम्यान गावात अनेक ठिकाणी काम शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही हाताला काम देत नाही. माझ्या घरी दहा जणांचं कुटुंब असून आता पुढे कसे होणार? असा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे. त्यातही प्रामुख्याने ढोलकीवर थाप केव्हा बसेल हे देखील माहीत नाही, त्यामुळे आमच्या हाताला काम द्या. एवढीच मागणी सरकारकडे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont know when the dholki will sound again the government should give us work msr 87 svk