एकीकडे गुटखा-पानमसाल्याची निर्मिती करून कर्करोगाला निमंत्रण द्यायचे आणि दुसरीकडे कर्करोगाच्या रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयांना देणगी द्यायची, अशी व्यावसायिकांची दुटप्पी नीती असल्याची टीका करीत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. व्यसनांच्या माध्यमातून नवीन रुग्ण निर्मितीचे कारखाने बंद व्हावेत, हाच सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालयाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महेश झगडे यांच्या हस्ते जेनेरिक औषध दुकानाचे उद्घाटन करण्यात आले. सहायक संचालक (आयुर्वेद) डॉ. सुधीर लोणे, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड, विश्वस्त डॉ. सुहास परचुरे, डॉ. विजय डोईफोडे, अधीक्षक डॉ. सदानंद देशपांडे या प्रसंगी उपस्थित होते. संस्थेमध्ये २५ वर्षांहून अधिक काळ रुग्णसेवा करणारे डॉ. पारस शहा आणि डॉ. प्रमोद कुलकर्णी यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
झगडे म्हणाले, आयुर्वेद ही मोठी शक्ती आहे. ती ओळखून आयुर्वेदाला महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याची आवश्यकता आहे. आयुर्वेदाचे डॉक्टर अ‍ॅलोपॅथी हा पर्याय म्हणून स्वीकारत असून अ‍ॅलोपॅथीच्या मागे धावताना आयुर्वेदाचे महत्त्व कमी करत आहेत. जगभरामध्ये ५० लाख कोटी रुपयांचा औषधांचा व्यवसाय आहे. त्यातील ५० टक्के औषधे विनाकारण दिली जातात. फार्मासिटय़ुकल्स कंपन्यांचा दबाव, डॉक्टरांना मिळणारे लाभ ही त्यामागची कारणे आहेत. त्यामुळे रुग्णाच्या खिशाला परवडतील अशा जेनेरिक औषधांचा पर्याय स्वीकारला पाहिजे. औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट पाहिजे हा कायदा असूनही त्याचे पालन होत नाही. औषध हे स्ट्राँग केमिकल आहे. त्याचा डोस किती, कसा घ्यायचा याचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. कित्येकदा चुकीच्या औषधांमुळे रुग्ण दगावण्याच्या घटना घडतात. त्यामुळेच औषध दुकानांमध्ये फार्मासिस्ट असला पाहिजे या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.
दत्ताजी गायकवाड, डॉ. सुहास परचुरे, डॉ. पारस शहा यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. सदानंद देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. उपअधीक्षक डॉ. कल्याणी भट यांनी आभार मानले.

Story img Loader