लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी: निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये मतदान केंद्र स्तरावरील अधिकारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत आहेत. पाच लाख ७९ हजार मतदारांपैकी आतापर्यंत तीन लाख ६५ हजार मतदारांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणात स्थलांतरित, मयत झालेल्या मतदारांची माहिती घेण्यात येत असून संबंधितांची नावे वगळण्यात येणार आहेत.

मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, प्रमाणिकरण, दुबार, समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानंकानुसार छायाचित्र प्राप्त करुन मतदार यादीत सुधारणा, विभाग अथवा भाग यांची आवश्यकतेनुसार सुधारणा आणि मतदान केंद्रांच्या सीमांच्यापुनर्रचना करण्यासाठी कालबद्ध योजना आखण्यात आली आहे. चिंचवड मतदारसंघामध्ये त्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. चिंचवडमध्ये ५१० मतदान केंद्र आहेत. तसेच काही मतदान केंद्र ही पहिल्या मजल्यावर आहेत. ही केंद्र तळ मजल्यावर घेण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्यामुळे मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्यात येणार आहे. यासाठी विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा… जालन्यातील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये कडकडीत बंद

चिंचवड, पिंपरी आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करणे, नावामध्ये दुरुस्ती करणे आणि आधार कार्ड जोडणे यासाठी दहा लाख संदेश (एसएमएस) पाठविण्यात आले आहेत. नागरिकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या व्होटर हेल्पलाइनचा वापर करून मतदान यादी शुद्धिकरण, अद्ययावतीकरणास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अमोल कदम यांनी केले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा मतदार संघ आहे. मतदार सर्वेक्षणाचे काम सुरू असून तीन लाख ६५ हजार मतदारांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. – नीलेश देशमुख, मतदार नोंदणी अधिकारी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Door to door survey in chinchwad assembly constituency the voters who have migrated and died will be omitted pune print news ggy 03 dvr
Show comments