‘आपल्या वीरांचे शत्रूलाही अनेकदा कौतुक वाटले आहे आणि शत्रूनेही उदारपणा दाखवला आहे. आपल्यालाही आपल्या शत्रूच्या उदारपणाचे कौतुक करण्याची सवय आपल्याला लागली पाहिजे,’ असे मत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शनिवारी व्यक्त केले.
दुर्ग फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे आणि दुर्ग फाउंडेशनच्या संकेतस्थळाचे अनावरण पुरंदरे यांच्या हस्ते झाले. या वेळी इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, शिवापट्टण केंद्र उभारणारे वास्तुविशारद कैलास सोनटक्के आदी उपस्थित होते. रविवारी आणि सोमवारी सकाळी १० ते सायंकाळी ८ या वेळेत राजा रवी वर्मा कलादालनात हे प्रदर्शन पाहता येणार आहे. राजेंद्र टिपरे यांनी टिपलेल्या भुईकोट किल्ल्यांच्या प्रतिमा या प्रदर्शनात पाहता येणार आहेत.
या वेळी पुरंदरे म्हणाले, ‘दुर्ग हा आपला समृद्ध इतिहास आहे. या किल्ल्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. चाकणच्या किल्ल्याने राजगुरूंसारखे क्रांतिकारक उभे केले. या किल्ल्यांचे जतन करा, त्याच्यावर लिहून, कचरा टाकून ते खराब करू नका. ‘किल्ले’ या घटकासाठी जगाने आपल्याकडे पहावे अशा पद्धतीने आपण हा वारसा जपला पाहिजे.’
दुर्ग फाउंडेशनतर्फे शिवापट्टण संस्कार केंद्र उभारण्यात येत असून त्यासाठी पुरंदरे यांनी या वेळी एक लाख रुपयांची देणगी जाहीर केली. या केंद्रात कलादालन, ग्रंथालय, वस्तुसंग्रहालय, खुला रंगमंच उभारण्यात येणार आहे.