पुणे : राज्यातील ४ हजार ७१८ शिक्षकांची यूडायस प्रणालीवर दुबार नोंदणी असल्याचे समोर आले आहे. दुबार नोंदणी असलेल्या शिक्षकांची माहिती तपासून यूडायस प्लस प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरतीबाबत चौकशीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात डॉ. प्रज्ञा सातव, अशोक जगताप, अभिजित वंजारी, राजेश राठोड, डॉ. वजाहत मिर्झा, जयंत आसगावकर, सतेज पाटील, धीरज लिंगाडे, सुधाकर अडबाले, किशोर दराडे यांनी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले.

हेही वाचा >>> पुणे : महाज्योतीतर्फे ३१४ उमेदवारांना यूपीएससी तयारीसाठी अर्थसहाय्य

राज्यात २०२२-२३पासून सर्व शाळा, विद्यार्थी, शिक्षकांची आधार वैधतेसह माबिती यूडायस प्लस प्रणालीत भरण्याची कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत सुरू आहे. त्यानुसार राज्यात १२ हजार ६५३ शिक्षकांची दुबार नोंदणी झाल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात माहिती तपासून अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. सद्यस्थितीत ४ हजार ७१८ शिक्षकांची यूडायस प्रणालीवर दुबार नोंदणी असल्याचे दिसून आले. दुबार नोंदणी असलेल्या शिक्षकांची माहिती तपासून यूडायस प्लस प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे केसरकर यांनी नमूद केले.

हेही वाचा >>> खळबळजनक! नळावर पाणी भरण्याचा वाद आणि…, मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात

पुणे जिल्ह्यातील १ हजार ४०३ बोगस शिक्षकांबाबत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. तसेच स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याच्या सूचना पुणे विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात आल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनियमित मान्यतेच्या अनुषंगाने संबंधितांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader