पिंपरी : मर्सिडिज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाला पर्यावरण नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत आत्ताच नोटीस दिल्याने आश्चर्य वाटत आहे. इतके वर्षे लक्ष का घातले नाही? असा सवाल उपस्थित करून खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत शासनाने खुलासा करून नेमकी परिस्थिती काय आहे याची सविस्तर माहिती देण्याची मागणी केली. फलक लावून कोणी मुख्यमंत्री होत नाही, असेही त्या म्हणाल्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या चिंचवड येथे आयोजित कौटुंबिक स्नेहमेळाव्यात खासदार सुळे बोलत होत्या. समरजितसिंग घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, शहर कार्याध्यक्ष विशाल काळभोर या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – पोलीस चौकीत पोलीस शिपायाला शिवीगाळ; बहीण-भाऊ अटकेत

हेही वाचा – टोमॅटो, फ्लॉवर, शेवगा, मटारच्या दरात वाढ

‘निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. मी पैशाला ताकद समजत नाही. लोकांच्या ताकदीवर विश्वास ठेवते. पैसे आणि सत्ता चालली असती तर मी निवडूनच आले नसते’, असे सांगून सुळे म्हणाल्या, ‘लोकसभा सचिवालयाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अधिकृत कार्यालय दिले आहे. त्यामुळे अदृश्य शक्तीला खरा पक्ष कोणता हे उशिरा कळले. फलक लावून कोणी मुख्यमंत्री होत नाही. जनता ठरवते. स्वाभिमानी महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याचे कर्तृत्व असलेली व्यक्ती मुख्यमंत्री व्हावी. त्यात महिला किंवा पुरुष असला तरी चालेल. पुढील आठ दिवसांत जागा वाटप पूर्ण होईल. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे गंभीर प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.’