आपल्या देशात कबुतरांच्या शर्यतीला नजरेत भरावे असे व्यावसायिक स्वरूप अद्याप आले नाही. तरी राज्यातील काही भाग हे या पक्ष्यांच्या शिस्तबद्ध शर्यतींसाठी ओळखले जातात. पुणे हे त्यातील महत्त्वाचे केंद्र आहे. गॅलरी, खिडक्यांच्या झडपा आणि वाट्टेल त्या मोकळ्या जागी घरटी बांधून आवाजी उच्छाद मांडणारी पाखरे म्हणून शहरी भागांत घरोघरी कबुतरांचा दुस्वास होतो. पण तरीही ती निगुतीने बाळगणारा कबुतरबाजांचा वर्ग शिल्लक आहे. कबुतरांच्या शिस्तबद्ध शर्यतीची सवय इंग्रजांनी पुण्याला घालून दिली. त्यानंतर पुण्यातील कबुतर पालकांनी ढाबळींचे वेड मनापासून जपले. मात्र त्या आधीपासून ढाबळी बाळगणे आणि त्याची ‘बाजी’ (पाखरांच्या उडण्याच्या क्षमतेची स्पर्धा) किंवा ‘उडान’ (सर्वाधिक उंच जाण्याची स्पर्धा) असे खेळ खूप पूर्वीपासून पुण्यात नदीकाठी रंगत असत.

कबुतर शर्यती

राज्यात पुण्यात या शर्यती पहिल्यांदा सुरू झाल्या. तयारीची कबुतरे बाळगणाऱ्या पालकांचे क्लब तयार झालेले आहेत. त्या क्लबच्या सदस्यांमध्ये किंवा दुसऱ्या शहरातील क्लबबरोबर या शर्यती होतात. पुण्यात अशा स्पर्धा भरवणारे दोन ते तीन क्लब आहेत. अशा शर्यतींमध्ये सहभागी होणाऱ्या साधारण २५ ते ३० ढाबळी आहेत. डिसेंबर ते साधारण मार्चपर्यंत त्यांच्यात शर्यती रंगतात. पुणे-सोलापूर, पुणे-पैठण, पुणे-अमरावती, पुणे-नागपूर असे विविध मार्ग निवडून या शर्यती होतात. ‘ओल्ड बर्ड्स डर्बी’, ‘ओल्ड बर्ड्स ओपन’, ‘यंग बर्ड्स डर्बी’, ‘यंग बर्ड्स ओपन’ अशा या शर्यती असतात. डर्बी प्रकारच्या शर्यतीत प्रत्येक सदस्य आपल्या ढाबळीतील एकच निवडक पक्षी सोडतो. ओपन प्रकारामध्ये थवा सोडला जातो. कबुतरांच्या पायांत संकेतांकाची चिठ्ठी अडकवलेली असते. दूरच्या भागातून कबुतरे सोडली जातात. त्यानंतर आपल्या घरी परत आल्यावर मालकाला कबुतराच्या पायातील चिठ्ठी मिळाली की शर्यत संपते. कबुतर सोडल्यापासून मालकाच्या हाती संकेतांकाची चिठ्ठी येईपर्यंतच्या वेळाची नोंद केली जाते. मोसमातील सगळ्या शर्यती झाल्या की विजेता जाहीर केला जातो, अशी माहिती पक्षिप्रेमी संघटनेचे हेमंत पुरोहित यांनी दिली.

स्थानिक स्पर्धा

कबुतरांची बाजी हा प्रकार पूर्वापार चालत आला आहे. यासाठी स्थानिक प्रजातींची कबुतरे बाळगली जातात. त्यांचे रंग आणि गुणवैशिष्टय़ांवरून त्यांची शिराजी, कोटर, खरबा, चॉपर अशी काही स्थानिक नावे आहेत. आकाशात रोज ठरावीक वेळेत थवे सोडले जातात. काही वेळेत घिरटय़ा मारत ती कबुतरे आकाशात उंचीची स्पर्धा करू लागतात. एकतानतेने सुरू असलेल्या या उडण्यावर मालकाच्या विशिष्ट शिटीचे नियंत्रण असते. त्याच्या इशाऱ्यावर सगळा थवा मालकाकडे येणे अपेक्षित असते. (काही भागांत उडण्याचा कालावधी, तर काही भागांत गाठलेली उंची यांवरून स्पर्धा होतात.) एखाद्या थव्यातील कबुतर चुकून दुसऱ्याच्या थव्यात गेले की (लटकले) ते त्या थवा मालकाचे होते. असे खेळ करणाऱ्या पुण्यात साधारण चारशे ते पाचशे ढाबळी आहेत. एखाद्या मोहिमेची योजना आखावी तशा प्रकारे बाजी जिंकण्यासाठी या ढाबळींचे मालक आखणी करत असतात.

गुन्हेगारीचेही निमित्त

कबुतरांच्या बाजी या अनेकदा दोन गटांमधील वादविवादांनाही कारणीभूत ठरतात. कबुतरांच्या ढाबळी चोरण्याच्या घटनाही सर्रास घडतात. अशा वादाचे पर्यवसान दोन वर्षांपूर्वी एका तरुणाच्या खुनात झाले आणि या ढाबळी पुन्हा चर्चेत आल्या.

 

Story img Loader