महापालिकेने सुरू केलेली अतिक्रमण कारवाई थांबवावी आणि पथारीवाल्यांना ओळखपत्रे द्यावीत, अशी मागणी पथारी पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी महापालिका भवनासमोर झालेल्या सभेत केली. कारवाई न थांबल्यास राज्यव्यापी आंदोलन सुरू केले जाईल आणि पथारीवाल्यांच्या मतपेटीची ताकद अजित पवार यांना दाखवली जाईल, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.
पथारीवाल्यांच्या तसेच स्टॉलधारकांच्या विरोधात महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी पथारी व्यावसायिक पंचायततर्फे सोमवारी महापालिकेवर मोर्चा नेण्यात आला. महापालिकेतील आरपीआयचे गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक रवींद्र माळवदकर हेही यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या सभेत बोलताना डॉ. आढाव म्हणाले की, सत्ताधाऱ्यांना पथारी व्यावसायिकांची आठवण फक्त मते मागण्याच्या वेळी होते. मात्र, त्यांच्या घरांवर आणि व्यवसायांवर कारवाई करताना सत्ताधाऱ्यांना पथारीवाल्यांचा विसर पडतो. हक्काचा रोजगार मिळत नसल्यामुळेच पथारीवाल्यांना रस्त्यावर व्यवसाय करावा लागत आहे. मात्र, तो रोजगारही आता हिरावून घेतला जात आहे. शहरातील सर्व पथारी व्यावसायिकांना ओळखपत्र द्यावीत या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही अद्याप ओळखपत्र देण्यात आलेली नाहीत.
ओळखपत्र देण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू करण्यासाठी आम्ही प्रशासनाला ३१ मार्चपर्यंत मुदत देत आहोत आणि तोपर्यंत कारवाई देखील थांबली पाहिजे अशी मागणी करून डॉ. आढाव म्हणाले की, या मुदतीत कार्यवाही न झाल्यास राज्यव्यापी लढा उभारला जाईल. तसेच पथारी व्यावसायिकांची राज्यव्यापी परिषदही आयोजित केली जाईल. पथारी व्यावसायिकांची ताकद येणाऱ्या निवडणुकीत अजित पवार यांना दाखवून द्यावी लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा